चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
“आजचा ग्राहक हा केवळ वस्तू खरेदी करणारा घटक नसून तो आपल्या हक्कांबाबत जागरूक असला पाहिजे. सजग ग्राहक घडवणे हीच खरी समाजसेवा असून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक व ऑडिटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील यांनी केले.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ग्राहक हक्क, जबाबदाऱ्या व सध्याच्या बाजारपेठेतील फसवणुकीच्या प्रकारांवर त्यांनी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
ॲड. पाटील पुढे म्हणाले की, “डिजिटल युगात ऑनलाइन खरेदी वाढली असली तरी त्यासोबत फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. जाहिरातींना भुलून न जाता वस्तूंची गुणवत्ता, किंमत, हमी, पावती व तक्रार निवारणाची प्रक्रिया यांची माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायदा हा सामान्य ग्राहकांचे हित जपणारा असून विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करून समाजात जनजागृती करावी.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव इंजिनीयर एम. एम. तुपारे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, “ग्राहक शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थीदशेतच ग्राहक हक्कांची जाणीव निर्माण झाली तर भविष्यात एक सशक्त, सजग आणि जबाबदार समाज घडू शकतो,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनामागील भूमिका स्पष्ट करताना, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जाणीव व सामाजिक बांधिलकी निर्माण होते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन डॉ. एन. एस. मासाळ यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. टी. ए. कांबळे होते. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment