सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा अंत नव्हे तर नव्या अध्यायाची सुरुवात...! - डॉ. नंदाताई बाभुळकर, कुदनूर येथे शंकर कोरी यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2025

सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा अंत नव्हे तर नव्या अध्यायाची सुरुवात...! - डॉ. नंदाताई बाभुळकर, कुदनूर येथे शंकर कोरी यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात

कुदनूर : सचिन तांदळे - सी एल वृत्तसेवा 

      सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा अंत झाला असे नाही तर कार्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली असे म्हणता येईल! असे प्रतिपादन डॉ. नंदाताई कुपेकर- बाभुळकर यांनी केले. त्या कुदनूर, तालुका चंदगड येथे तिरमाळ शाळेचे अध्यापक शंकर शिदबसू कोरी यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. शंकर कोरी हे ३१ मे २०२५ रोजी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा केंद्र शाळा कुदनूरच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी कुदनूरच्या सरपंच संगीता सुरेश घाटगे या होत्या. 

    कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिमापूजन एम. जे. पाटील, कोवाडच्या सरपंच अनिता भोगण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती पुष्पमाला जाधव यांच्या हस्ते झाले. मान्यवरांच्या हस्ते शंकर कोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना बाभूळकर म्हणाल्या कोरी सरांनी ज्ञानदानाबरोबर समाज कार्यालाही वाहून घेतले आहे. त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व संघर्षातून घडले आहे. जिद्द कष्टांच्या जोरावर ते शिक्षक झाले ते नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. स्वर्गीय बाबा कुपेकर तसेच आईसाहेब आमदार असताना ते वैयक्तिक कामे घेऊन आमच्याकडे कधीच आले नाहीत तर या परिसरातील विकासाची कामे घेऊन आले. त्यामुळे त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ लक्षात येते. असे त्यांनी आवर्जून सांगितले. अनेक संकटांचा सामना करत आपली वाटचाल प्रगतीपथावर ठेवली आहे. सेवा निवृत्तीनंतरच्या काळातही ते आपले समाज प्रबोधन व समाजकार्य निरंतर ठेवतील अशा शब्दात त्यांनी कोरी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना उदय जोशी यांनी जेव्हा कोरी सरांनी स्वर्गीय बाबा कुपेकरांचे नेतृत्व स्वीकारले तेव्हापासून आजतागायत ते निष्ठेने कुपेकर घराण्याच्या पाठीमागे राहिले आहेत. यापुढेही कोरी यांनी आपल्याकडे कोणतेही काम घेऊन आले तर ते पूर्ण करण्यात आम्ही कमी पडणार नाही. ते ज्या शाळेत असतील त्या शाळेची इमारत, शाळेकडे जाणारे रस्ते, वीज, गटार दुरुस्ती यांच्या पुर्ततेसाठी लोक प्रतिनिधींकडे जाऊन ती कामे पूर्ण करून घ्यायचे. त्यामुळेच ते पालक वर्गात लोकप्रिय ठरले.

 यावेळी बोलताना एम. जे. पाटील म्हणाले मी स्वतःला कुदनूर गावाचाच मानतो. माझे कुदनूरशी अतूट नाते आहे. म्हणूनच ज्या ज्या वेळी कोरी यांनी विकासाच्या बाबी निदर्शनास आणल्या त्या पूर्ण केल्या आहेत. पुढेही त्यांनी समाज कार्याला वाहून घ्यावे. राजकीय दृष्ट्या ही त्यांना आपला पाठिंबा राहील असे सांगितले. यावेळी सत्कारमूर्ती शंकर कोरी, राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन पी. बी. पाटील, वसंत जोशीलकर, यादू मोदगेकर, महादेव शिवनगेकर, निवृत्त केंद्रप्रमुख डी. आय. पाटील, दस्तगीर उस्ताद, अनिता भोगण, मानसी भोगनण, प्रकाश कसलकर आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास राजू डोणकरी, पोलीस पाटील नामदेव लोहार, आजी-माजी सैनिक संघटनेचे राजाराम मोहनगेकर, बाबाजान कालकुंद्रीकर, ईश्वर गवंडी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू पवार, विजय पाटील आदींसह कुदनूर केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, तिरमाळ येथील विद्यार्थी, कुदनूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भैरू भोगण यांनी केले.

No comments:

Post a Comment