![]() |
| दाटे येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरामध्ये बोलताना प्रा. ॲड. एन. एस. पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास दाटे–बेळेभाट–वरगाव, नाईक वाडा ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रात काल मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन खेडूत शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील व संस्थेचे संचालक व ऑडिटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी विशेष मार्गदर्शन करताना प्रा. ॲड. एन. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सखोल व प्रेरणादायी भाषण केले. “राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे केवळ उपक्रमांचा कार्यक्रम नसून समाजाशी थेट संवाद साधणारी मूल्याधारित चळवळ आहे. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ नोकरी मिळवणे नसून समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी व जबाबदार नागरिकत्व या मूल्यांची जोपासना केली तरच राष्ट्र प्रगत होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक समता व स्वयंसेवकांची भूमिका यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगून या शिबिरातील उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. एस. डी. गावडे यांनी केले. त्यांनी एनएसएस विभागाची माहिती देत महाविद्यालयाच्या सामाजिक कार्याची वाटचाल विशद केली.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. पी. आर. पाटील, संस्थेचे सचिव इंजि. एम. एम. तुपारे व संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिबिर यशस्वी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
उद्घाटन समारंभास प्रणाम हॉटेलचे मालक व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्याची कीट भेट दिल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. व्ही. के. गावडे यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार आनंद सुतार, संचालक शामराव मुरकुटे, दाटे–बेळेभाट–वरगाव, नाईक वाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण नाईक, माजी सरपंच अमोल कांबळे, उपसरपंच शंकर धुरी, पोलीस पाटील संदीप गुरव, संतोष मोरे डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एन. के. पाटील, डॉ. अंजली माने, डॉ. के. एन. निकम, डॉ. जी वाय कांबळे, रवी कांबळे सर विक्रम कांबळे, युवराज पाटील गवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या कालावधीत दाटे–बेळेभाट–वरगाव परिसरात स्वच्छता अभियान, श्रमदान, वृक्षारोपण, आरोग्य व सामाजिक जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजकार्याचा अनुभव मिळणार आहे.

No comments:
Post a Comment