खेडूत संस्था वक्त्यांची शाळा बनेल – ॲड. प्रा. एन. एस.पाटील, विद्यार्थ्यांनी उंचावला ‘खेडूत चषक’ - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2026

खेडूत संस्था वक्त्यांची शाळा बनेल – ॲड. प्रा. एन. एस.पाटील, विद्यार्थ्यांनी उंचावला ‘खेडूत चषक’


चंदगड : सी एल वृत्तसेवा

     विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणाऱ्या आणि विचारांना धार देणाऱ्या खेडूत शिक्षण मंडळ आयोजित संस्थांतर्गत खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या ओघवत्या वाणीबरोबरच विचारांची प्रगल्भता अनुभवायला मिळाल्याने उपस्थितांनी या स्पर्धेचे विशेष कौतुक केले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एस. पाटील होते. स्पर्धेचे प्रास्ताविक संयोजक एम. एम. तुपारे यांनी केले ते यावेळी म्हणाले की " आजच्या स्पर्धात्मक जगात टिकायच असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या तील क्षमतांचा अधिक वापर करणे गरजेचे आहे .भाषण स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा या सारख्या स्पर्धा मधून विद्यार्थी घडतील . उत्कृष्ट वक्ता घडविण्यासाठी संस्थातर्गत विविध प्रयत्न केले पाहिजे".  स्वागत मुख्याध्यापक एन. डी. देवळे यांनी केले.

    बक्षीस वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना प्रा.एन. एस. पाटील म्हणाले, “आज इथे शब्द बोलायला आलेले नाहीत, आज इथे विचार उभे राहिले आहेत. ही स्पर्धा जिंकण्याची नाही, स्वतःला शोधण्याची आहे. आज व्यासपीठावर उभा असलेला प्रत्येक विद्यार्थी उद्या समाजाच्या व्यासपीठावर बोलणारा नेता असेल. भविष्यात खेडूत संस्था वक्त्यांची शाळा बनेल.” त्यांच्या या प्रभावी विचारांनी सभागृह भारावून गेले.

    यावेळी प्रा आर पी . पाटील यांनी, “खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा म्हणजे केवळ जिभेचा व्यायाम नाही; इथे मेंदू, मन आणि माणूस घडतो,” असे प्रतिपादन केले. तसेच डॉ. पी. आर. पाटील यांनी आत्मविश्वासाच्या बळावर भाषणकलेद्वारे व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.यावेळी झोया मुल्ला, संगिता यमकर, कावेरी कोले, सृष्टी वणकुंद्रे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली . पालकांमधून श्री . अब्दुल रहिम मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तर परीक्षक रविंद्र पाटील यांनी परीक्षकांची भूमिका मांडली. निष्पकक्ष स्पर्धा परीक्षणासाठी संस्थेच्या बाहेरील परीक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते .

    मराठी व इंग्रजी भाषामधून या स्पर्धा एकूण चार गटामध्ये घेण्यात आल्या . १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते .

   स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक गौरवचिन्हे, पुस्तके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पालकांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. गुरुवर्य म. भ. तुपारे गुरुजी यांच्या स्मरणार्थ गौरवचिन्हे संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे यांनी प्रदान केली, तर पुस्तके व प्रमाणपत्रांचे वितरण डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले.

    स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. तेलगोटे, एम. एम. गावडे, एम. एम. शिवणगेकर, रविंद्र पाटील व सतीश बोकडे यांनी काम पाहिले. त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

    कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार ए. व्ही. सुतार यांच्यासह एस. एम. फर्नांडीस, व्ही. डी. सडेकर, एस. व्ही. मुरकुटे, टी. एस. चांदेकर, एस. व्ही. गुरबे, एम. एन. माने, आर. आर. देसाई तसेच विविध विद्याशाखांचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार एम. एन. शिवणगेकर यांनी मानले.

   विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणारा हा उपक्रम खेडूत शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा शिरपेच ठरला.

No comments:

Post a Comment