चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बसर्गे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा मंगळवार, दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात साजरी होणार आहे. या यात्रेनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यात्रेच्या दिवशी पहाटे देवीची अभिषेक व महापूजा, नैवेद्य अर्पण, आरती तसेच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दिवसभर देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण राहणार असून पारंपरिक विधी, धार्मिक कार्यक्रम व उत्सवामुळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
श्री भावेश्वरी देवी ही बसर्गे गावाची ग्रामदैवत असून गावकऱ्यांची श्रद्धा व आस्था देवीवर आहे. दरवर्षी होणारी ही यात्रा गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान राखून आहे. यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे भावेश्वरी देवस्थान मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तरी सर्व भाविकांनी या यात्रेचा लाभ घेऊन श्री भावेश्वरी देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन भावेश्वरी देवस्थान मंडळ, बसर्गे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment