चंदगड येथील क्रीडा संकुल उभारणीचे काम का रखडले? चौकशीची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2026

चंदगड येथील क्रीडा संकुल उभारणीचे काम का रखडले? चौकशीची मागणी

  

नायब तहसीलदार यांना रखडलेल्या क्रीडा संकुल उभारणी कामाच्या चौकशीचे निवेदन देताना आनंद हळदणकर व चंदगड येथील नागरिक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        तब्बल १६ वर्ष रखडलेल्या चंदगड येथील क्रीडा संकुल व क्रीडांगणाच्या काम कामाची चौकशी करावी व ठेकेदाराला काळे यादी टाकावे अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक आनंद हळगणकर व नागरिकांनी तहसीलदार चंदगड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

       चंदगड येथील नगरपंचायत हद्दीत सन २००९ मध्ये क्रीडांगणासह क्रीडा संकुल उभारणीला मंजुरी मिळाली. तेव्हापासून क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्यात आले तथापि २०२६ वर्ष उजाडले तरी हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. या कामाचा ठेका धनसंपदा गडहिंग्लज या कंपनीला दिला होता. १६ वर्षे पूर्ण झाली तरी क्रीडा संकुल व क्रीडांगण पूर्ण होऊ शकले नाही परिणामी आज कितीतरी खेळाडू या सुविधेपासून वंचित राहिले आहेत. १६ वर्षांच्या काळात उदयोन्मुख खेळाडूंचे कधीच भरून न येणारे नुकसान झाले आहे. हे काम तेव्हाच पूर्ण झाले असते तर यातून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले असते.

       सदरची जागा तत्कालीन ग्रामपंचायत ने शासनाला क्रीडा संकुल उभारणी कामी दिलेली होती. जमीन देताना या जागेत काजूची झाडे होती. या झाडांपासून तेव्हा वार्षिक सरासरी एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचे. उत्पन्न देणारी झाडे काढून ठेकेदार कंपनीने क्रीडा संकुल उभारणी काम सुरू केले होते. तथापि १६ वर्षे काम अपूर्ण आहे.  मात्र इतक्या वर्षांत काजू झाडांपासून मिळणारे संभाव्य उत्पन्न झाडे काढल्यामुळे वाया गेले. क्रीडा संकुल ही नाही आणि काजूचे उत्पादन ही नाही. अर्थात 'तेलही गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे.' अशी स्थिती झाली आहे. हे इतक्या वर्षाचे नुकसान ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावे, ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून कायदेशीर कारवाई करावी. केलेल्या कारवाईची लेखी पत्र आम्हाला द्यावी अशी मागणी बाळासाहेब उर्फ आनंद मारुती हळदणकर माजी नगरसेवक चंदगड यांनी केली असून क्रीडा संकुल चे रखडलेले काम शासनाने निधी देऊन तत्काळ पूर्ण करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर आनंद हळदणकर, गुलजार नाईकवाडी, संदीप सुतार, सुशांत कांबळे, शंकर मनवाडकर, सुभाष गावडे, नारायण शेलार आदींसह चंदगड येथील अनेक रहिवाशांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment