चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवत नामवंत 'ॲक्सिस बँके'त नोकरी मिळवली आहे. आय.बी.एफ. स्किल अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या या विशेष निवड प्रक्रियेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रोहन कांबळे, सानिका पाटील, स्वप्नील गावडे, प्रज्वल कांबळे आणि रविराज पेडणेकर यांचा समावेश असून त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही कॉर्पोरेट क्षेत्रात आपली ओळख निर्माण करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिअर गायडन्स सेलचे प्रमुख डॉ. आर. एन. साळुंके यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. साळुंके यांनी स्पष्ट केले की, महाविद्यालयाचा करिअर गायडन्स सेल विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध आहे. यापूर्वीही अनेक नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ही परंपरा अशीच पुढे चालू राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या मुलाखती आय. बी. एफ. स्किल अकॅडमीचे संचालक स्वरूप कारंडे यांनी घेतल्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची बँकेच्या विविध पदांसाठी निवड केली. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक व्ही. के. गावडे यांनी मानले. या विशेष प्रसंगी प्रा. एल. एन. गायकवाड, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. टी. ए. कांबळे यांसह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

No comments:
Post a Comment