माडखोलकर महाविद्यालयात 'डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर' प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2026

माडखोलकर महाविद्यालयात 'डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर' प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी शिक्षण पुरेसे नसून, विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक कोर्सेसच्या माध्यमातून स्वतःला अधिक कुशल बनवणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य मंडळ, तसेच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला 'डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर' (Database Administrator) हा विशेष कौशल्य विकास कोर्स यशस्वीरीत्या संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वाटप सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक व ऑडिटर ॲड. एन. एस. पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

        कार्यक्रमाची सुरुवात भूगोलशास्त्र विभागप्रमुख व समन्वयक डॉ. एन. एस. मासाळ यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या भाषणातून या वैशिष्ट्यपूर्ण कोर्सच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. आजच्या डिजिटल क्रांतीच्या काळात माहिती साठवणूक आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरला मोठी मागणी असल्याचे सांगत, त्यांनी अशा कोर्सेसचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी गोरल उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना संस्थेचे ऑडिटर ऍड.एन. एन. पाटील यांनी कौशल्य विकासावर विशेष भर दिला. त्यांनी नमूद केले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता तांत्रिक कोर्सेस करून स्वतःला रोजगारासाठी सक्षम बनवावे. आजच्या स्पर्धेच्या युगात पदवीसोबतच एखादे विशेष कौशल्य हाताशी असणे अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       हा विशेष प्रशिक्षण कोर्स यशस्वी करण्यासाठी प्रा. आर. व्ही. आजरेकर, प्रा. पी. ए. गवस, प्रा. सचिन गावडे आणि अर्जुन गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डेटाबेस मॅनेजमेंटमधील विविध तांत्रिक बारकावे आत्मसात केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविद्यालयाने राबवलेल्या या स्तुत्य आणि कौशल्यधारित उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळातून आणि पालकांमधून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment