चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आज अर्ज छाणनीमध्ये ४ अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये तुडये नाकरीकांचा मागास प्रवर्गातून नीता बाबु परीट यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे जिल्हा परिषद गटासाठी २६ उमेदवारांचे ४४ अर्ज वैध ठरले.
पंचायत समिती गणामध्ये कुदनुर गणामध्ये शिवाजी नागोजी गणाचारी, तुर्केवाडी गणातून सर्वसाधारण आरक्षणातून विष्णु सुभाना कार्वेकर यांचा तर तुडये गणातून सर्वसाधारण महिला आरक्षणातून रजनी रवळनाथ कांबळे यांचा अर्ज अवैध ठरला. पंचायत समितीमध्ये ८४ उमेदवारांचे ११९ अर्ज वैध ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी शुक्रवारी (ता. २३), शनिवार (ता. २४), मंगळवारी २७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत आहे. रविवार व सोमवार सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्विकारण्यात येणार नाही. अर्ज माघारीला मोजकेच दिवस शिल्लक असल्याने तोपर्यंत कोणत्या राजकीय घडामोडी होऊन कोण-कोणते उमेदवार माघार घेतात, त्यावरच लढतीचे मुख्य चित्र स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. दिनांक १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची सखोल छाननी करण्यात आली.
जिल्हा परिषद गटांबाबत पाहता, अडकूर, माणगाव, कुदनूर व तुडये या चार गटांमधून एकूण ४५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. यापैकी १ नामनिर्देशन अपात्र ठरले असून २६ उमेदवारांची ४४ नामनिर्देशन पात्र ठरली आहेत. पात्र नामनिर्देशनांमधून एकूण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
अडकूर (सर्वसाधारण महिला) गटात ११ उमेदवारांचे १८, माणगाव (ना.मा. प्रवर्ग महिला) गटात ४ उमेदवारांचे ७, कुदनूर गटात ८ उमेदवारांचे १४, तर तुडये गटात ३ उमेदवारांचे ५ अर्ज वैध ठरले आहेत.

No comments:
Post a Comment