![]() |
| संग्रहित छायाचित्र |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
हरियाणा राज्यातील पानिपत येथे १४ जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्य दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून पानिपत लढाईतील शहीद सैनिकांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यासह गोवा राज्यातून अनेक मराठे दिनांक १० रोजी रवाना होणार आहेत.
१४ जानेवारी १७६१ मध्ये हरियाणा राज्यातील पानिपत कर्नाल व घरोंदा परिसरात मराठा सैनिक व परकीय आक्रमक अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. पानिपतची तिसरी लढाई म्हणून ही इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला असला तरी भारतीय इतिहासाला नवी दिशा देणारी ही लढाई ठरली. देशाच्या रक्षणासाठी हजारो मराठा सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. मराठा सैन्यात केवळ मराठेच नसून महाराष्ट्रातील सर्व जातीच्या सैनिकांचा समावेश होता. पेशवे मराठा सैन्यातील लाखो सैनिक आपल्या कुटुंबकबिल्यासह या मोहिमेत सहभागी झाले होते कुटुंबातील करता पुरुष लढाईत धारातीर्थी पडल्यामुळे सोबत गेलेल्या बायका मुलांचे अतोनात हाल झाले आजही सुमारे दहा लाख मराठा 'रोड मराठा' या नावाने या परिसरातील अनेक गावांत वास्तव्य करून आहेत.
या वीरांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी पानिपत जवळील बसताडा गावाजवळ दरवर्षी १४ जानेवारी रोजी शौर्य दिन पाळला जातो. यावेळी शहीद वीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सह देशाच्या देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो देशभक्त येऊन नतमस्तक होतात. यावर्षीही बुधवार दि. १४ रोजी शौर्य दिन पळाला जात आहे. यावेळी आपल्या कोल्हापूर, बेळगाव जिल्हा व गोवा राज्यातील अनेक जाती धर्मातील देशभक्त नागरिक उपस्थित राहण्यासाठी शनिवारी दि. १० रोजी रवाना होणार आहेत. पत्रकार श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड) यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण दिल्ली मार्गे कार्यक्रम स्थळी जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत दीपक भिकू गावडे (न्हावेली), राजाराम शिवाजी पाटील, गोवा (मुळगाव ढोलगरवाडी, ता चंदगड), गोपाळ कांबळे (उमगाव, ता चंदगड), अमरसिंह शिवाजीराव जगदाळे (बस्तवडे, ता. कागल), आदींसह बेळगाव, कोल्हापूर व गोव्यातून अनेक जण रवाना होणार आहेत. अशी माहिती अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील कोल्हापूर यांनी दिली.

No comments:
Post a Comment