चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"सध्याच्या काळात जागतिक तापमान वाढ आणि निसर्गचक्राचा ढासळत चाललेला समतोल ही चिंतेची बाब आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक व भौगोलिक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस. बी. तावदारे यांनी केले.
ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये भूगोल व पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित 'भूगोल दिन' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना भूगोलाचे महत्त्व आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
आपल्या विस्तृत भाषणात प्रा. तावदारे यांनी स्पष्ट केले की, भूगोल हा केवळ जमिनीचा अभ्यास नसून तो मानवी अस्तित्वाचा पाया आहे. ते म्हणाले, "आज मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची हानी होत आहे. जर आपण भौगोलिक नियमांचे पालन केले नाही, तर भविष्यात मोठे संकट ओढवू शकते. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष निसर्गाचे निरीक्षण करावे. नकाशा वाचन, स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शाश्वत विकासाकडे वाटचाल करू शकतो." तसेच, भूगोल विषयातील संशोधनाच्या संधी आणि या क्षेत्रातील रोजगाराच्या नवीन वाटांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी आपल्या भाषणात भूगोल विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करत, अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया प्रगल्भ होते असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मासाळ यांनी केले. यामध्ये त्यांनी भूगोल दिन साजरा करण्यामागचा उद्देश आणि विभागाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला.
या सोहळ्याला महाविद्यालयातील डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एन. के. पाटील, डॉ. आर. के. सूर्यवंशी, डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एस. एस. सावंत, व्ही. के. गावडे, डॉ. एस. डी. गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने संचालन डॉ. एस. एन. पाटील यांनी केले, तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. एस. डी. कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment