चंदगड : सी एल वृत्तसेवा
येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये थोर समाजसुधारक, विचारवंत व शेतकरी-कष्टकरी वर्गाचे नेतृत्व करणारे डॉ. एन. डी. पाटील यांचा स्मृतिदिन आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते.
डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन अॅड. एन. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अॅड. एन. एस. पाटील म्हणाले, “डॉ. एन. डी. पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामाजिक न्याय, शिक्षण आणि शेतकरी-शोषित वर्गासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, खेडूत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी सहकार मंत्री तसेच पेझंट्स अँड वर्कर्स पार्टी चे प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख होती. ‘कमवा व शिका’ या योजनेवर त्यांनी विशेष भर दिला.”
यावेळी संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील म्हणाले, “डॉ. एन. डी. पाटील हे महाराष्ट्र विधान परिषदेचे तब्बल १८ वर्षे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी सहकार मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. शेतकरी, कष्टकरी आणि शोषित वर्गासाठी त्यांनी अनेक आंदोलने उभारली. रयत शिक्षण संस्था, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांसारख्या संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच सीमा लढ्यामध्ये अग्रेसर असणारे लढाऊ नेते म्हणून त्याने या चळवळीचे नेतृत्व केले. सामाजिक व राजकीय लढ्यांमधील त्यांचा ठसा महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.”
या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनिल काणेकर, माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, नगरसेविका सुधा गुरबे, व्ही. डी. देसाई, व्ही. एन. कांबळे, एस. एम. निळकंठ, एस. व्ही. शेख, ए. व्ही. धायगुडे, जे. जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना रेळेकर यांनी केले.

No comments:
Post a Comment