चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'विवेक जागर मंच'च्या वतीने चिरंतनी स्वाती कृष्णात हिच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा "विवेक जागर साथी पुरस्कार २०२६" महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रामदास देसाई (उत्साळी ता. चंदगड) यांना जाहीर झाला असल्याची माहिती विवेक जागर मंचचे कार्याध्यक्ष सुनिल स्वामी यांनी दिली.
या वर्षीचा "विवेक जागर साथी पुरस्कार वितरण समारंभ १ मार्च रविवारी दुपारी २ वाजता र. भा. माडखोलकर कॉलेज, चंदगड येथे होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विवेक जागर मंचचे सचिव स्वाती कृष्णात यांनी केले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर २०१६ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सहभागी झालेले रामदास देसाई यांनी डोंबिवली (जि. ठाणे) इथून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला सुरुवात केली. २०१७ साली कल्याण (जि. ठाणे) शाखेच्या स्थापनेपासून कल्याण शाखेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले आहे. कोरोनाच्या काळात मुंबई येथील नोकरी गेल्यानंतर त्यांना कल्याणहून कोल्हापूरला स्थलांतर करावे लागले. या काळात आलेल्या आर्थिक चणचणीमध्येसुद्धा त्यांनी आपली वैचारिक बांधिलकी आणि कृतीशीलता कायम ठेवत कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात सहभाग घेतला.
२०२१ नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे संघटनात्मक काम वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे काम ते अगदी निरपेक्ष भावनेने करत आहेत. २०२२ ते २०२५ या काळात त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विविध उपक्रम विभाग राज्य सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. सध्या ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. होळी लहान करा-पोळी दान करा, फटाके मुक्त दिवाळी, असे उपक्रम राबवत असतानाच व्यसनमुक्ती अभियान, संविधान जागर अशा कामांत त्या संघटनेचे प्रतिनिधित्व करत आहेत.
परिवर्तनाच्या चळवळीतील कामाबरोबरच ते चंदगड, आजरा, गडहिंग्लज व भुदरगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये 'बळीराजा काजू दर संघर्ष समिती' च्या माध्यमातून जनजागृती करत असतात.
रामदास देसाई यांनी समतावादी विचारांनी प्रभावित होऊन सुरु केलेले हे अंधश्रद्धामुक्त, वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला विवेकवादी समाज घडवण्याचे कार्य नव्याने सामाजिक कामात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरणारे आहे.
मानवताकेंद्री समाज उभारण्याकरिता परिवर्तनवादी चळवळीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जनमानसांत रुजवण्याकरिता काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

No comments:
Post a Comment