चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक बँकिंग किंवा अकाउंटिंग क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास आयटी (IT) क्षेत्रात करिअरच्या उत्तुंग संधी उपलब्ध आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात स्किल अपडेट करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गडहिंग्लज येथील 'डोमेन कॉम्प्युटर्स'चे संस्थापक प्रा. एम. आर. पाटील यांनी केले.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 'बी.कॉम. नंतर आयटी क्षेत्रातील संधी' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
प्रा. एम. आर. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील विविध प्रवाहांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना डेटा मॅनेजमेंट आणि फायनान्शिअल सॉफ्टवेअरचे उत्तम ज्ञान असते. त्यामुळे त्यांनी जर Tally Prime, SAP, डेटा ॲनालिसिस किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग यांसारख्या तांत्रिक कौशल्यांची जोड दिली, तर त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सहज उपलब्ध होऊ शकतात. आयटी क्षेत्रात केवळ इंजिनिअर्सच लागतात हा समज चुकीचा असून कॉमर्स बॅकग्राउंड असलेल्या तरुणांना तिथे मोठी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. पदवी शिक्षणासोबतच अशा तांत्रिक विषयांचे मार्गदर्शन घेतल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. अर्थशास्त्र विभागाने आयोजित केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध विद्यार्थीभिमुख उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. के. गावडे यांनी केले. आभार प्रा. महादेव गावडे यांनी मानले. या व्याख्यानास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि बी.कॉम.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment