चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत “समारंभ व्यवस्थापन : रोजगार निर्मितीचे उदयोन्मुख क्षेत्र” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. हलकर्णी क्लस्टरमधील विविध महाविद्यालयांतील समन्वयक प्राध्यापकांसह सुमारे ७५ विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थान स्थानिक खेळाडू शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नाही. कौशल्याधारित शिक्षण आणि स्वयंरोजगाराची दिशा विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे. लग्नसमारंभ, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा यांचे प्रमाण वाढत असल्याने समारंभ व्यवस्थापन क्षेत्रात ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि संघभावना या गुणांवर आधारित हा व्यवसाय तरुणांना आर्थिक स्वावलंबन देऊ शकतो.”
पहिल्या सत्रात प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. गोरल, यांनी समारंभ व्यवस्थापन व्यवसायाची संकल्पना, त्याचे प्रकार आणि आवश्यक कौशल्ये यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे केवळ सजावट किंवा स्टेज उभारणे नव्हे; तर कल्पना, नियोजन, बजेटिंग, प्रसिद्धी, ग्राहकांशी संवाद, जोखीम व्यवस्थापन आणि तांत्रिक हाताळणी यांचा एकत्रित परिणाम होय.” त्यांनी लहान-मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन कसे करावे, खर्च नियंत्रण कसे ठेवावे तसेच डिजिटल माध्यमांचा (सोशल मीडिया मार्केटिंग) उपयोग करून ग्राहकवर्ग कसा वाढविता येतो याबाबत उदाहरणांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कमी भांडवलात सुरुवात करून हळूहळू व्यवसाय विस्तार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
दुसऱ्या सत्रात इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी या क्षेत्रातील प्रत्यक्ष व्यवसायिक संधी आणि करिअर मार्ग स्पष्ट केला. “आज विवाह सोहळे, वाढदिवस, शासकीय-शैक्षणिक कार्यक्रम, कॉर्पोरेट मीटिंग, प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव यासाठी प्रशिक्षित समारंभ व्यवस्थापकांची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागात केटरिंग, डेकोरेशन, साउंड-लाईट, फोटोग्राफी, डिजिटल निमंत्रणपत्रिका, सोशल मीडिया प्रमोशन अशा अनेक पूरक सेवा सुरू करून युवक-युवती स्वयंरोजगार निर्माण करू शकतात,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे प्राथमिक साधनसामग्री, ग्राहकांशी व्यवहार पद्धती व टीमवर्कचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. महादेव गावडे यांनी केले, तर आभार प्रा. युवराज हेरेकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. एम. एम. माने, डॉ. आर. के. कमलाकर, उपस्थित होते.
कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना नव्या व्यवसाय संधींची दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment