![]() |
| शिनोळी येथे दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमावेळी बोलताना संजय साबळे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
“जीवनात कधीही छोटी स्वप्ने पाहू नका. मोठी स्वप्ने पाहताना कष्ट करायला लाजू नका. कारण उदात्त स्वप्नेच यशाचा खरा मार्ग दाखवतात. आयुष्यात स्पर्धेशिवाय जगण्यात मजा नाही; स्पर्धाच आपल्याला नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देते,” असे प्रेरणादायी प्रतिपादन कवी, लेखक व उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक संजय साबळे यांनी केले. ते राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. (ता. चंदगड) येथे आयोजित इयत्ता दहावीच्या निरोप व सदिच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे सचिव श्री. बी. डी. तुडयेकर होते, तर केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. अध्यक्षीय भाषणात बी. डी. तुडयेकर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य आणि संस्कार यांच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले.
आपल्या प्रभावी व ओघवत्या भाषणात संजय साबळे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. “गंभीर परिस्थितीत शांतपणे विचार केला, तर मोठे प्रश्नही चुटकीसरशी सोडवता येतात. परीक्षेला घाबरू नका; ती तुमच्या क्षमतेची संधी आहे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या भाषणाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
यावेळी केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. “यश मिळवायचे असेल, तर स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. संघर्षाशिवाय व्यक्तिमत्त्व घडत नाही,” असे ते म्हणाले.
वर्गशिक्षक रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कु. श्रेया बेळगावकर, जानवी सुतार, विश्रांती मेणसे, श्रेया बोकमूरकर, संध्या कांबळे, श्रावणी कांबळे व साक्षी मेणसे यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक एन. टी. भाटे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विक्रम तुडयेकर यांनी मानले.

No comments:
Post a Comment