चंदगड : प्रतिनिधी
भारतीय सहकार चळवळीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर, चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे 'एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. सध्या स्थितीत भारतीय सहकार क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावर होणारी ही परिषद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुरस्कृत असून शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी सकाळी 10.00 वाजता संपन्न होणार आहे.
सहकार क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि विशेषतः ग्रामीण विकासाचा कणा मानला जातो. या पार्श्वभूमीवर, बदलत्या काळात सहकार संस्थांसमोर उभ्या ठाकलेल्या समस्या आणि भविष्यातील संधींचा वेध घेण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (AI), डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ग्रामीण भागातील सर्वसमावेशक विकास या मुद्द्यांवर या परिषदेत विशेष 'मंथन' होणार आहे.
या परिषदेसाठी विद्यापीठ स्तरावरील नामवंत 'सल्लागार समिती' (Advisory Committee) लाभली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) ज्योती जाधव, कुलसचिव प्रा. (डॉ.) व्ही. एन. शिंदे, थायलंड सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन अरुण नरके, अधिष्ठाता प्रा. (डॉ.) वर्षा मैंदरगी, माजी अधिष्ठाता प्रा. (डॉ.) एस. एस. महाजन, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावचे वाणिज्य विभागप्रमुख प्रा. (डॉ.) बी. एस. नवी, माजी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ए. एम. गुरव, माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) एम. एस. देशमुख यांसारख्या दिग्गज मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे.
परिषदेत एकूण ११ महत्त्वाच्या उपविषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. यामध्ये सहकार क्षेत्रातील धोरणात्मक आराखडा, शिक्षण आणि प्रशिक्षण, महिला उद्योजकता, नाबार्डचे योगदान आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्व गुण यांसारख्या विषयांचा समावेश आहे. या चर्चेतून निघणारे निष्कर्ष सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
परिषदेचे अध्यक्ष व निमंत्रक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एस. डी. गोरल आहेत. आयोजन सचिव प्रा. (डॉ.) टी. ए. कांबळे (वाणिज्य विभाग) आणि सह-सचिव डॉ. ए. वाय. जाधव (अर्थशास्त्र विभाग) यांच्यासह संपूर्ण आयोजन समिती या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.
या परिषदेसाठी देशभरातील नामवंत संशोधक आणि तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले असून, निवडक शोधनिबंधांचे प्रकाशन ISSN मानांकित 'पीअर रिव्ह्यू' जर्नलमध्ये केले जाणार आहे. शोधनिबंधाचा पाठवण्याची अंतिम तारीख १२ मार्चपर्यंत आहे तरी जास्तीत जास्त प्राध्यापक, संशोधक आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासकांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment