सुभाष देसाई कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राला गती देतील :अनिल सिध्देश्वर - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2026

सुभाष देसाई कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राला गती देतील :अनिल सिध्देश्वर

  


चंदगड: सी एल वृतसेवा

सहकार क्षेत्राच्यामाध्यमातूनच कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट होत आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघावर ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांची झालेली निवड ही कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला अधिक बळ देणारी आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबरच सहकारातही सुभाष देसाई यांचा मोठा हातखंडा असून याचा कोल्हापूरच्या प्रगतीसाठी नक्कीच लाभ होईल असे मत लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना कागलचे संचालक अनिल सिद्धेश्वर यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूरच्या सर्किट हाऊस येथे ब्लॅक पॅंथर पक्ष कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने आयोजित सुभाष देसाई यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

     यावेळी ब्लॅक पॅंथर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सुभाष देसाई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी आपल्या मनोगतातून सुभाष देसाई यांची राज्याच्या बेरोजगार व स्वयंरोजगार संघावर निवड होणे ही ब्लॅक पॅंथर पक्षासाठी अभिमानाची व कौतुकाची गोष्ट आहे. या निवडीमुळे सहकार संघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारांचे प्रश्न व स्वयंरोजगारासाठी विशेष प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून सुभाष देसाई यांच्याबरोबर लातूरचे सिकंदर पटेल-शेख, परभणीचे संतोष बोबडे, नंदुरबारचे अशोक माळी, धाराशिवचे प्रशांत साळुंखे,शिवडी-मुंबईचे बाळासाहेब घाडगे, घाटकोपर पश्चिम मुंबईचे गणेश उर्फ गणपत मोरे, वाशिमचे चंद्रकांत ठाकरे, यवतमाळचे मनीष दवे, दिवान सोआऊट नागपूरचे चिंतामण नागपुरे, छत्रपती संभाजीनगरचे समीर राजपूत, हिंगोलीचे उमाशंकर माळोदे, रत्नागिरीचे सचिन कोल्हापुरे, अकोल्याचे संजय वानखडे, पुण्याचे माणिक सुपणार, रूपाली दाते व मुळशी-पुण्याचे बाबाजी कुंभार, कोल्हापूरचे तेजस्वी महाजन, बाळासाहेब कोळेकर आणि सांगलीचे रोहित चिवटे या सर्व निवडूण आलेल्या संचालकांचे ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

     यावेळी सत्काराला उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले की, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व पी आर पालकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी संघ मुंबईची स्थापना करून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रतिनिधित्व दिले होते. पुन्हा एकदा माझ्या कार्यांची दखल घेऊन सहकाऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला अधिन राहून मला मिळालेल्या संचालकपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेडोपाड्यातील सहकारी संस्था, बेरोजगारांचे प्रश्न व स्वयंरोजगारासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

      यावेळी कार्यक्रमाला ब्लॅक पॅंथर पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, जिल्हा सचिव सुरेश सातपुते,करवीर तालुका अध्यक्ष तानाजी गोंधळी, पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा प्रियांका माने, कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा कल्पना कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष आनंदा सातपुते, चंदगड तालुकाध्यक्ष प्रा. दीपक कांबळे, चंदगड तालुका उपनिरीक्षक वैजनाथ कांबळे, कोकरे गावचे माजी सरपंच नारायण किरमटे, करवीर तालुका युवक अध्यक्ष राजू चांदणे, हातकणंगले तालुका अध्यक्ष, अनिल लोंढे, जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम पाटील, करवीर तालुका उपाध्यक्ष कृष्णात कांबळे, सागर माने, किरण शिरगावकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सुरेश सातपुते यांनी मानले.

No comments:

Post a Comment