आरोग्य सेवा लोकाभिमुख करणार : सौ. सारिका नांदेकर, तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2026

आरोग्य सेवा लोकाभिमुख करणार : सौ. सारिका नांदेकर, तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

 


चंदगड  / प्रतिनिधी

आरोग्य सेवा अधिक प्रभावी, सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सौ. सारिका नांदेकर यांनी चंदगड येथे केले.

यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव, हेरे आणि कानूर खुर्द येथे प्रत्यक्ष भेट देत तेथील आरोग्य सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ उपलब्धता तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला. पाहणी दौऱ्यात आढळलेल्या त्रुटी तत्काळ दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यानंतर चंदगड पंचायत समिती सभागृहात बांधकाम व आरोग्य विषयक आढावा बैठक पार पडली. बैठकीत प्रलंबित विकासकामांना गती देणे, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, सभापती विलास पाटील, पंचायत समिती सदस्य तानाजी गडकरी, जीवन साखरे, पांडुरंग बेनके, मनस्विनी कांबळे, रवी बांदिवडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment