चंदगड, दि. 21 जून 2026 :
पंचायत समिती चंदगड येथील सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य "निरोगी वृद्धत्वासाठी योग" असे होते.
योग शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडण्याचे कार्य करतो. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, मनःशांती लाभते आणि उत्तम जीवनशैली घडण्यास मदत होते. बदलत्या जीवनशैलीमध्ये शांततापूर्ण आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगाला पर्याय नसल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. योग हा सुखी व समृद्ध जीवनाचा राजमार्ग असल्याचेही सांगण्यात आले.
पंचायत समिती चंदगड, ग्रामीण रुग्णालय चंदगड तसेच भरारी सामाजिक संस्था, नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात दीपक नाईक यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योगाचे महत्त्व पटवून दिले. प्रार्थना, पूरक हालचाली आणि विविध योगासनांच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना योगाचे फायदे समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक देसाई यांनी केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय चंदगडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रश्मी माळगावकर, पंचायत समिती चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रकाश देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील हसुरे, आयुष विभाग प्रमुख डॉ. स्नेहल थोरात (हसुरे) तसेच पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment