चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या कार्यालयासाठी नाममात्र शुल्क आकारून तब्बल ३६ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील समस्त काजू उत्पादक शेतकरी, उद्योजक आणि नागरिकांच्या वतीने आमदार श्री. पाटील यांनी उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले.
या ३६ एकर जागेवर महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक काजू प्रक्रिया सुविधा, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोदामे तसेच काजू उद्योगाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला नवी दिशा मिळणार असून हजारो काजू उत्पादक शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हा निर्णय चंदगडच्या कृषी व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून काजू उत्पादन, प्रक्रिया आणि विपणनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून भविष्यातही मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकल्पांसाठी प्रयत्न कायम राहतील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment