चंदगड तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार, नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत, विजेचा लपंडाव - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2026

चंदगड तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार, नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत, विजेचा लपंडाव

                 


संपत पाटील, चंदगड

चंदगड तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, तालुक्यातील नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे व झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सतत पडत असलेल्या पावसामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागातील तांबड्या मातीच्या परिसरात भात रोपलावणीसाठी आवश्यक असलेला चिखल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने रोपलावणीच्या कामांना वेग आला असून, संपूर्ण शिवारात शेतीची कामे सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे व फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. काही गावांमध्ये वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, वीज वितरण यंत्रणेकडून तो सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास तालुक्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होऊन नदीपात्राबाहेर पाणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

एकूणच, मुसळधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला असून, खरीप हंगामातील शेतीकामांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र तालुकाभर दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment