आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोवाड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2026

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोवाड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

 


चंदगड / प्रतिनिधी : 

चंदगड मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड आणि आरोग्य सहाय्यता कक्ष (गडहिंग्लज) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत होणार आहे.

या शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आजारांचे निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मोफत औषध वाटप, आरोग्य मार्गदर्शन तसेच गरजूंना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हाडांचे विकार, हृदयरोग, मधुमेह, डोळे, त्वचारोग, ईएनटी, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोगाचे प्राथमिक निदान अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.

शिबिराचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील राहणार आहेत. यावेळी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आयोजकांनी नागरिकांना या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, शिबिरास येताना आधार कार्ड, रेशन कार्ड व जुने वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत, असेही सांगितले आहे.

No comments:

Post a Comment