ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, चंदगड तालुक्यात भात रोप लावणीलाही वेग - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2026

ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, चंदगड तालुक्यात भात रोप लावणीलाही वेग

कालकुंद्री शिवारात भात रोपे लावणी कामात व्यस्त असलेले शेतकरी

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या मान्सूनचा पाऊस चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्री डोंगर माथा परिसरातील ईसापूर, पारगड ते चंदगड व दाटे पर्यंत संततधार सुरू होता. तथापि गेल्या चार दिवसांत तो तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भाग ओलांडून राजगोळी, यर्तेनहट्टी, दड्डी पर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे तालुक्यातील ओढे नाले प्रवाहीत झाले आहेत. परिणामी तालुक्याची जीवन वाहिनी ताम्रपर्णी नदी ची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

 

कोवाड येथील जुन्या बंधाऱ्याजवळ आजची (दि. ४ जुलै) पाण्याची स्थिती

    आज दिनांक ४ जुलै २०२६ रोजी तालुक्यातील जंगमहट्टी, झांबरे- उमगाव, फाटकवाडी या तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्पांपैकी घटप्रभा नदीवरील फाटकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे‌ यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांना पाटबंधारे विभागामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर ताम्रपर्णी नदीवरील झांबरे उमगाव प्रकल्प ६० टक्के भरला असून पावसाचा जोर आठ दिवस असाच राहिल्यास प्रकल्प ओव्हर फ्लो होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी २५ जून रोजी कोवाड येथील जुना बंधारा पाण्याखाली गेला होता. यावर्षी मात्र मृग नक्षत्राने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे नदीला पहिले पाणी यायला जुलै महिना उजाडला. दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णा खोरे योजनेतून बांधण्यात आलेल्या वीस लघुपाटबंधारे तलावांमधील पाणी पातळीत पश्चिम भागात झपाट्याने तर पूर्व भागात संथ गतीने वाढ होत आहे. 

  यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे संपूर्ण देशावर दुष्काळाची छाया पसरणार? अशा बातम्यांमध्ये चिंतित असलेले चराचरसृष्टी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सुखावली आहे. आर्द्रा नक्षत्राने शेवटच्या टप्प्यात चांगली बॅटिंग केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात असून संपूर्ण चंदगड तालुक्यात भात रोपे लावण्याची धांदल उडाली आहे. शिवारात चिखल करण्यासाठी बैलांचे औत व ट्रॅक्टर चा वापर केला जात आहे. परिणामी बैलजोडी, ट्रॅक्टर रोटर व मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मिळेल त्याला हाताशी घेऊन एकमेका सहाय्य करू म्हणत शेतकरी वर्गाने पैरा पद्धत सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment