चंदगड / प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून, ती तातडीने जमा करण्याची मागणी आमदार शिवाजीराव शंकरराव पाटील यांनी राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली.
यासंदर्भात आमदार पाटील यांनी कामगारमंत्री फुंडकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी शासनाच्या संकेतस्थळावर विहित पद्धतीने ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आलेली नसल्याने कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांची थकीत शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी आमदार पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
या मागणीला कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सद्यस्थितीची माहिती घेतली. तसेच येत्या काही दिवसांत सर्व पात्र बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment