पुणे / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित ग्रामीण तरुणांचे रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे होणारे स्थलांतर कमी करून त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्प चंदगडमध्ये सुरू करावेत, अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली. प्रत्यक्ष भेटीत त्यांनी यासंदर्भातील सविस्तर निवेदनही सादर केले.
चंदगड मतदारसंघ हा गोवा, कर्नाटक सीमेलगत असून मोपा (गोवा), बेळगाव आणि कोल्हापूर या विमानतळांच्या तुलनेने जवळ आहे. या भौगोलिक स्थितीचा फायदा स्थानिक रोजगार, शेती आणि पर्यटनाच्या विकासासाठी करून घेण्याच्या दृष्टीने आमदार पाटील यांनी चार प्रमुख प्रकल्पांचा प्रस्ताव मांडला आहे.
यामध्ये DGCA मान्यताप्राप्त ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर (RPTO) सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतीतील औषध फवारणी, जमीन मोजणी व आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित ड्रोन पायलटची वाढती गरज लक्षात घेता या केंद्रातून स्थानिक तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतील.
तसेच ‘कृषी उडान’ योजनेंतर्गत ॲग्री-कार्गो आणि कोल्ड-चेन लॉजिस्टिक्स हब उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. चंदगड परिसरातील काजू, मसाले, सेंद्रिय भाजीपाला आणि लाल तांदूळ यांसारख्या कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास यामुळे मदत होणार असून पॅकेजिंग, ग्रेडिंग, साठवणूक आणि वाहतूक क्षेत्रातही रोजगारनिर्मिती होऊ शकते.
स्थानिक युवकांना गोवा, बेळगाव व कोल्हापूर विमानतळांवरील रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी ग्राउंड हँडलिंग आणि हॉस्पिटॅलिटी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचीही मागणी आमदार पाटील यांनी केली. AASSC आणि NSDC यांच्या सहकार्याने विमानतळ ग्राउंड हँडलिंग, कार्गो ऑपरेशन्स व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण या केंद्रातून देता येणार आहे.
यासोबतच RCS-UDAN अंतर्गत हेलिपॉर्ट व हेलि-टुरिझमला चालना देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. तिलारी, आंबोली, पारगड आणि कलानिधीगड यांसारख्या पर्यटनस्थळांना जोडल्यास पर्यटनाला चालना मिळून होमस्टे, स्थानिक वाहतूक, हस्तकला आणि कृषी उत्पादनांच्या विक्रीतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे आमदार पाटील यांनी नमूद केले.
या चारही प्रकल्पांमुळे सीमाभागातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दारे खुली होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. त्यामुळे प्रस्तावांची प्राथमिक व्यवहार्यता तपासणी करून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी विनंती आमदार पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडे केली. या प्रस्तावांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment