राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस (ओलम) साखर कारखान्याचे शेती अधिकारी सुधीर पाटील यांना निवेदन देताना संघटनेचे कार्यकर्ते. |
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस (ओलम)
साखर कारखान्याच्या व्यवस्थापणाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागील थकीत बिले अदा
करावीत व चालू गळीत हंगामातील ऊसाला संघटनेच्या मागणीनुसार एफआरपी अधिक २००
रूपयांचा दर जाहीर करावा. अशी मागणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केली आहे. शेती अधिकारी सुधीर पाटील यांना
निवेदन देण्यात आले. कारखान्याने शेतकऱ्याना गृहीत धरून पोलीस बळाचा वापर करून
गळीत हंगाम सुरु केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही
संघटनेने दिला आहे.
ऊस दराचा तोडगा निघण्यापूर्वीच हेमरस कारखाना
सुरु करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजताच संघटनेने निवेदन देऊन कारखाना
प्रशासनाला आपली भूमिका पटवून दिली आहे. हेमरसकडून दोन वर्षाची शेतकऱ्यांची देय
बीलं आहेत. त्यामुळे तात्काळ ही बिलं शेतकऱ्याना द्यावीत व चालू गळीत हंगामातील
ऊसाला शासनाच्या धोरणाप्रमाणेच एफआरपी अधिक २०० रूपयांचा दर जाहीर करावा.
कायद्यानुसार एफआरपीची रक्कम गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत द्यावीत. अशी मागणी
संघटनेने केली आहे. कारखाना लवकर सुरु करावा ही संघटनेची भूमिका आहे.पण ऊस दराची
मागणी धुडकावून कारखाना सुरू करायचा प्रयत्न केल्यास संघटना स्वस्थ बसणार नाही.
स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील यांच्या
नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यानी निवेदन दिले.