चंदगड येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज द्या या मागणचे निवेदन देताना धैर्यसिंग सावंत-भोसले, कृष्णा पाटील, महादेव गावडे व ग्रामस्थ. |
महावितरणच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे
शेतकऱ्यांच्या शेतीचे गणित बिघडत आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा विजेचा पुरवठा करा.
ही मागणी सात दिवसात मान्य न झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन
छेडण्याचा इशारा कानूर विद्युत सबस्टेशन वरील वीजपंपधारकांनी दिला आहे. याबाबतचे
निवेदन चंदगड येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देवून याबाबत चर्चा करण्यात
आली. धैर्यशील सावंत-भोसले यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सद्या शेतीपंपाना
रात्री 8.20 ते सकाळी 6.20 असे तीन दिवस व सकाळी 6.20 ते दुपारी 2.20 पर्यंत वीज
पुरवठा केला जात आहे. या परिसरात जंगली प्राणी, गवे, अस्वल, हत्ती, रानडुक्कर व सर्प
इत्यादीपासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. या वेळापत्रकामुळे शेतीची कोणत्याही
प्रकारची कामे करता येत नाहीत. कानूर परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून
आम्हाला दिवसा बारा तास वीज मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा यापूर्वी सकाळी
10 ते सायंकाळी 6 व रात्री 1 ते सकाळी 10 या वेळेत वीज मिळावी. हे वेळापत्रक कधीही
बदलू नये. संपूर्ण भागातील पूर्वीची विद्युत व्यवस्था कोलमडली असून दुरुस्त करावी.
या मागण्या येत्या 7 दिवसात मान्य न झाल्यास पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने
आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी होणाऱ्या नुकसानीला वीज कंपनी जबाबदार
राहील अशा आशयाचे निवेदन विद्युत वितरण कंपनीला देण्यात आले. निवेदनावर धैर्यशील सावंत-भोसले,
विठ्ठल तेजम, पुंडलिक पाटील, कृष्णा पाटील, हरिभाऊ गावडे, गोविंद कुरुळकर,
पांडुरंग पाटील, रमेश देसाई, धोंडीबा जाधव, नागोजी गावडे, तुकाराम मोहिते,
रामचंद्र बोलके, प्रकाश पाटील, बाळू लाड, महादेव कुडतरकर यांच्यासह 35 हून अधिक ग्रामस्थांच्या
सह्या आहेत.
No comments:
Post a Comment