कालकुंद्री परिसरात ओला चारा चोरीच्या घटनांत वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2019

कालकुंद्री परिसरात ओला चारा चोरीच्या घटनांत वाढ


कालकुंद्री / प्रतिनिधी 
गेल्या काही दिवसात कालकुंद्री (ता. चंदगड) येथील परिसरात मका, शाळू, जोंधळा, बाजरी आदी प्रकारच्या हिरव्या वैरण चोरांचा सुळसुळाट झाला आहे.
सोमवार 1 एप्रिल 2019 रोजी रात्री कालकुंद्री येथील लक्ष्मण रानबा मुंगुरकर यांच्या शेतातील सुमारे एक ट्रॅक्टर ट्रॉली मका चोरट्यांनी कापून लंपास केला. मंगुरकर यांनी दुसर्‍यांकडून कसण्यास घेतलेल्या ' कोलकार तग' नावाच्या शेतातील जमिनीत 10 ते 15 गुंठे ऊस लावणी केली होती. यात जनावरांसाठी उन्हाळ्यात ओल्या चाऱ्यासाठी आंतरपीक म्हणून मका लावला होता. सुमारे दहा फूट उंच वाढलेला मका चोरट्यांनी रातोरात कापून नेला. डोळ्यात भरणारे जोमदार पीक पाहून अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मका विकत देण्याबाबत विचारणा केली होती. जीवापाड जपलेल्या पशुधनाचा घास चोरट्यांनी हिरावून नेल्याने त्यांच्यासमोर वैरणीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. गावातील शेतकऱ्यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सद्या सर्वत्र शेतीपूरक दुग्ध व्यवसाय फोफावला असला तरी दुसऱ्याच्या शेतातील वैरण आपली जनावरे पोसण्याच्या प्रकारांना चाप बसवण्याचे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले आहे. चोरट्यांना जरब बसेल अशी पावले उचलण्याची मागणी सामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.


No comments:

Post a Comment