तहसिल कार्यालयातील बैठकीत निर्णय, साखर विक्रीला परवानगी
![]() |
चंदगड येथील तहसिल कार्यालयात दौलतकडील थकीत एफआरपीच्या रकमेबाबत आयोजित बैठकीवेळी उपस्थित शेतकरी व पदाधिकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
न्युट्रीएटस् कंपनीने सन 2016-17 सालात गाळप केलेल्या एक लाख 39 हजार 672 टन ऊसाची थकित एफआरपीची 5 कोटी 15 लाख 64 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज चंदगड येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार विनोद रणावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी, कामगार, जिल्हा बॅंक व अथर्वचे प्रतिनिधी यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांची थकित एफआरपी रक्कम 15 टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजच्या बैठकीत जिल्हा बॅंकेने 3 कोटी 30 लाख व अथर्व कंपनीने 1 कोटी 85 लाख रूपये अशी 5 कोटी 15 लाख 64 हजार रूपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेला दौलतच्या गोदामातील शिल्लक साखर विक्री करता येणार आहे. तहसिल कार्यालयात झालेल्या बैठकीला दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळवीकर प्रा. एन. एस. पाटील, सभापती बबनराव देसाई, शांताराम पाटील, प्रभाकर खांडेकर, कृष्णा रेगडे, कामगार प्रतिनिधी प्रदीप पवार, अनिल होडगे, राजेंद्र पावसकर, डॉ. माने, रणवीर चव्हाण, जावेद फरास, अथर्व सचिव हजर होते.
चौकट - दौलतची साखर अडवून वेळोवेळी शेतकऱ्यांची ही रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. दोन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर शेतकऱ्यांच्या रक्कम देण्याला यश आल्याचे दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment