![]() |
खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथील किंदळीतळ येथे महादेव पवार यांच्या शेतात हत्तींने जमीनदोस्त केलेले भातपिक. |
खालसा गुडवळे (ता. चंदगड) येथून जवळच असलेल्या किंदळीतळ येथे गेल्या तीन दिवसापासून हत्तीकडून नुकसान सुरुच आहे. हत्तींचा मुक्काम याच परिसरात असल्यामुळे परिसरातील शेतकरी भितीच्या छायेखाली वावरत आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. त्यांना भयमुक्त वातावरणात जगण्यासाठी वनविभागाने हत्ती हटाव मोहीम काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी शेतकरी महादेव पवार यांच्या भात, नाचना पिकांच्यासह परसातील बैलगाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. राजेंद्र घुमे, रमेश शिंदे व सुभद्रा शिंदे यांच्या भातशेतीचे हत्तीकडून रोजचे नुकसान सुरुच आहे. या परिसरात हत्तींचा मुक्काम असून सायंकाळी घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. हत्तींकडून रोजच नुकसान सुरु असल्याने शेती करावी की सोडून द्यावी अशा मानसिकतेत येथील शेतकरी आहे. हातातोंडाशी आलेली पिके हत्तीकडून जमीनदोस्त केली जात असल्याने शेतीचे हे विदारक चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रु ओघळत आहेत. होणाऱ्या नुकसानीचे बाजारभावाप्रमाणे भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र वनविभागाकडून तुजपुंजी भरपाई देवून शेतकऱ्यांची एक प्रकार थट्टाच केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. मात्र येथील शेतकऱ्यांची शेतीवरच चरीतार्थ चालत असल्याने जगावे कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. नुकसान भरपाईसाठी कागदपत्राचा ससेमिरा तो ही वेगळाच. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी मानसिक त्रासासह वेळ व पैशाचाही अपव्यय होत असल्याने सरकारने यावर कायमस्वरुपी तोडगा काढावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment