मुलभुत सुविधासह गावच्या विकासासाठी तिरमाळ ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2019

मुलभुत सुविधासह गावच्या विकासासाठी तिरमाळ ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

तिरमाळ (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन तहसिलदारांना देताना ग्रामस्थ. 
कोवाड / प्रतिनिधी
तिरमाळ (ता. चंदगड) गावाने विविध मूलभूत सुविधा अद्याप गावात न पोहोचल्याच्या कारणास्तव विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन त्यांनी आज चंदगडचे तहसिलदार यांना दिले. कोलीक नंतर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे तिरमाळ हे तालुक्यातील दुसरे गाव ठरले आहे. मात्र आज कोलिक ग्रामस्थांनी माघार घेतली आहे. 
चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडे कर्नाटक हद्दीवर वसलेले तिरमाळ हे चारशे पन्नास लोकवस्तीच्या गावात साडेतीनशे मतदारसंख्या आहे. राजगोळी बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या या गावची सेवा संस्था राजगोळी बुद्रुक येथे आहे. त्यामुळे रॉकेल, रेशन,खते तिथूनच आणावे लागते. गावात स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षात रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, दळणवळण, आरोग्य आदी मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे येथील अबालवृद्धांची ससेहोलपट सुरू आहे. गाव विकासापासून वंचित राहिल्याने एखाद्या धनगरवाड्याचे स्वरूप अद्यापी गावाला आहे. या कारणास्तव ग्रामस्थांनी २१ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एक मुखी निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन आज चंदगड तहसीलदार यांना ग्रामस्थांनी दिले. निवेदनावर आनंद कुंभारकोप, सत्यापा नाईक, आडवया स्वामी, कामाना नाईक, भरमा कोणेरी, नारायण कोनेरी, परसु नाईक, मारुती माने, बसया स्वामी आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत. याबाबत सरकारी पातळीवर कोणती पावले उचलली जातात, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



No comments:

Post a Comment