कागणी कालकुंद्री रस्ता, कोल्हापूर दड्डी बस व अनियमित बससेवाप्रश्नी रास्ता रोकोचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2019

कागणी कालकुंद्री रस्ता, कोल्हापूर दड्डी बस व अनियमित बससेवाप्रश्नी रास्ता रोकोचा इशारा

सहा महिन्यात प्रचंड दुरावस्था झालेला कागणी-कालकुंद्री नवीन रस्ता.
कोवाड / प्रतिनिधी
सहा महिन्यापूर्वी केलेला दिड किमी लांबीचा नवीन कागणी ते कालकुंद्री रस्त्यात खड्डे पडल्याने वाहतुकीला अयोग्य बनला आहे. कोल्हापूर दड्डी मार्गे कोवाड बस बंद अवस्थेत आहे. कर्यात भागातील कालकुंद्री-बेळगाव-कालकुंद्री, चंदगड- राजगोळी, चंदगड-कामेवाडी अनियमित बससेवा या तीन प्रश्नांसाठी कर्यात भागातील सर्व ग्रामपंचायत, ग्रामस्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रवासी संघटना व कोवाड येथील ज्युनियर व सिनियर कॉलेज विद्यार्थ्यांनी सोमवार (ता. २५) रोजी कागणी येथे कोवाड-बेळगाव मार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. 
आगाराने नादुरुस्त म्हणून शेरा आलेला पण सुस्थितीत असलेला दड्डी पुलावरील रस्ता.
पावसाळ्यात सुरू असलेली वाळू वाहतूक व अवजड वाहनांमुळे नवीनच केलेला कागणी रस्ता खचून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. चार महिन्यापासून दड्डी पूल रस्ता नादुरूस्त या कारणास्तव  कोल्हापूर दड्डी मार्गे कोवाड मुक्काम बस बंद करण्यात आले. तथापी या पुलावरून मोठ्या वाहनांसह सर्व वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. सहा महिन्यापासून चंदगड वरून एक वाजता सुटणारी राजगोळी बस कॉलेज विद्यार्थ्यांच्यासाठी उपयोगी कामेवाडी, कुदनुर भागात जाणाऱ्या अनेक बसेस बंद आहेत. या सर्व प्रश्नी सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधून घेण्यासाठी वरील सर्व ग्रामपंचायत व संघटनांच्या वतीने रास्ता रोकोचा इशारा देण्यात आलेला आहे. यात परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी, प्रवासी, वाहनधारक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment