तिलारी हायवे प्रोजेक्ट कंपनी विरोधात अंदोलनाचा इशारा, चंदगड पं. स. मासिक बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2019

तिलारी हायवे प्रोजेक्ट कंपनी विरोधात अंदोलनाचा इशारा, चंदगड पं. स. मासिक बैठक

चंदगड पंचायत समितीची प्रशासकीय इमारत
चंदगड / प्रतिनिधी
गारगोटी - गडहिंग्लज - नागनवाडीमार्गे-चंदगड- तिलारीनगरला जोडणाऱ्या महामार्गाचे काम  घेतलेल्या "तिलारी हायवे प्रोजेक्ट"या कंपनीने लवकर काम  सुरू करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा  सदस्य दयानंद काणेकर यानी दिला. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ते बोलत होते. सभापती बबनराव  देसाई अध्यक्षस्थानी होते   या रस्त्याचे तातडीने काम सुरू करावे , असा एकमुखी ठरावही मंजूर करण्यात आला  स्वागत प्रभारी गटविकासाधिकारी  ए . एस . सावळगी यांनी केले . विषय पत्रिकेचे वाचन संजय चंदगडकर यांनी केले . नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.     
करवीर , गारगोटी व कागल येथे कंपनीने काम सुरू केले आहे ; परंतु चंदगड तालुक्यात अद्याप या कंपनीने कामच सूरू केले नाही.अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्डे भरण्याचे काम अत्यंत निकृष्टपणे केले जात असल्याचा आरोप सदस्य दयानंद काणेकर यांनी केला तर चंदगड फाटा ते चंदगड या रस्त्याचीही अत्यंत दुर्दशा झाली असून भरले जाणारे खड्डेही व्यवस्थित केले जात नसून त्यामुळे लोकांच्या रोषाला लोकप्रतिनिधीना  सामोरे जावे लागत असल्याचे अॅड . अनंत कांबळे यांनी सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाला ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या .गारगोटी ते कोदाळी या रस्त्याचे काम पुणे येथील तिलारी हायवे प्रोजेक्ट ' कंपनीने घेतलेले असून करारानुसार हा रस्ता ३० जून २०२० पूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे . तथापि आंदोलन केल्यानंतरच या ठेकेदाराने रस्त्याचे काम अन्य तालुक्यातून केलेले आहे , त्यामुळे चंदगड तालुक्यात आंदोलन झाल्याशिवाय ठेकेदाराला जबाबदारीची जाणीव होणार नाही , यावर पंचायत सदस्यांचे एकमत होऊन या रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . बेळगाव - वेंगुर्ले रस्त्यापाठोपाठ चंदगड फाटा ते चंदगड या रस्त्यावरील पॅचवर्क चांगल्या पध्दतीने करावे , अशी मागणी सौ . रूपा खांडेकर यांनी केली.  चंदगड  तालुक्यातील प्राथमिक शाळातील वीजेचे बील कुणी भरावे , हा प्रश्न या बैठकीच्या ऐरणीवर होता . जिल्हा परिषदेने शाळेना इतर खर्चासाठी दहा हजारांची तरतूद केलेली आहे . तरीही यातून इलेक्ट्रिक बील भरल्यास अन्य खर्चाला निधीच उरत नसल्याची वस्तुस्थिती आहे . मात्र ग्रामपंचायतीनी चौदाव्या वित्त आयोगातून प्राथमिक शाळांचे इलेक्ट्रिक बील भरावे , असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे . तथापि एकदा बील भरले तर पुढेही सातत्याने वीज बील भरण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली तर विकासाला निधी कमी पडेल , अशी ग्रामपंचायतीची भूमिका आहे . यासंबंधी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरले . तथापि शाळांच्या इमारती या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असल्यामुळे बील भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असून त्यांनीच वीज बील भरणे योग्य होईल , असे मत जगन्नाथ हुलजी यांनी नोंदवले . त्यातच बील भरणा न झालेल्या शाळातील वीज जोडणी तोडली जात असून त्यासंबंधी आपण वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती करून यासंबंधीचा निर्णय लागेपर्यंत वीज पुरवठा खंडित करू नका , असे पत्र देऊ असे सभापती बबनराव देसाई यांनी स्पष्ट केले . चंदगड तालुक्यात बालदिन सप्ताह उत्साहात पार पडला असून २६ नोव्हेंबर रोजी गुणगौरव सोहळा आहे . ३ ते ५ डिसेंबर अखेर हलकर्णी येथे विज्ञान प्रदर्शन , १० ते १३ डिसेंबर अखेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तर १७ ते २० डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केल्याचे गटशिक्षणाधिकारी सौ.एस एस सुभेदार यांनी सांगितले . चंदगडच्या ग्रामीण रूग्णालयात ११ पदे रिक्त आहेत२२५ जणांच्या रक्त तपासण्या अंती दोघांना एचआयव्हीचा प्रार्दुभाव झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे डॉ . एस . एस . साने यांनी सांगितले . नांदवडे , करेकुंडी , पाटणे येथील नळपाणी योजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचे ए एस सावळगी यानी सांगितले  . चंदगड तालुक्यात १००० मुलामागे ९७७ मुलींचे प्रमाण असून दोन मुलीवर ५१ टक्के कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या असून ३०६ अंगणवाड्यातील १३१७६ मुलांची आरोग्य तपासणी झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ . आर . के . खोत यांनी सांगितले . एकात्मिक बाल विकास प्रकल्पाकडे १० पर्यवेक्षिकांपैकी ६ पर्यवेक्षिकांच्या जागा रिक्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले . यावेळच्या चर्चेत सभापती बबनराव देसाई , उपसभापती विठाबाई मुरकुटे , सौ . रूपा खांडेकर , ॲड . अनंत पाटील , दयानंद काणेकर आदींचा सहभाग होता . आभार जगन्नाथ हुलजी यांनी मानले.

No comments:

Post a Comment