महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला दंड व शिक्षा - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2019

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला दंड व शिक्षा


चंदगड / प्रतिनिधी
मुलासह अंगणात झोपलेल्या महिलेचा विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी बसवणी यलाप्पा नाईक (रा. गणेशवाडी, ता. चंदगड) याला चंदगड न्यायालयाने दोषी ठरविले. या प्रकरणी बसवाणी नाईक याला न्यायाधीश दिनेश गायकवाड यांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एक वर्षाचा कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच धमकी दिल्याप्रकरणी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी (ता. 20) या दाव्याचा निकाल लागला. 
गणेशवाडी (ता. चंदगड) येथील बसवाणी यलाप्पा नाईक याने 15 मे 2013 रोजी रात्री दोनच्या सुमारास आपल्या मुलांसोबत अंगणात झोपलेल्या महीलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पिडीत महीलेने घडलेली माहिती आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानुसार चंदगड पोलिसांत बसवाणी यांच्या विरोधात 4 जून 2013 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पो. हे. कॉ. बाजीराव कांबळे यांनी केला व संशयित आरोपी बसवाणी नाईक यांच्यावर चंदगड न्यायालयात पोलिसांनी 354 व 506  नुसार आरोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश दिनेश गायकवाड यांच्या समोर हा निवाडा झाला. न्यायाधीश श्री. गायकवाड यांनी संशयित आरोपी बसवाणी नाईकला एक वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा व धमकी दिल्या प्रकरणी तीन महीने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील सचिन भादुले यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरला. या प्रकरणामध्ये पिडीत महिला व पो. हे. कॉ. बाजीराव कांबळे यांनी दिलेली साक्षी महत्वाच्या ठरल्या असून पैरवी अधिकारी म्हणून पो. हे. कॉ. महादेव जाधव यांनी काम पाहिले. 


No comments:

Post a Comment