शासकीय आणि खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2019

शासकीय आणि खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा देताना रांगेत उभे न ठेवता शासकीय आणि खासगी रूग्णालयांनी उपचारासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. 
जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शहाजी सभागृहात आज झाली. या बैठकीला जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, समाजकल्याण निरीक्षक संजय पवार, सीपीआरच्या अधीक्षक डॉ, तेजस्विनी सांगरूळकर, शिवाजी विद्यापीठाचे उप कुलसचिव विलास नांदवडेकर, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप, शहर अध्यक्ष दिलीप पेटकर, संजय पाटील, फारूक देसाई आदी उपस्थित होते. डॉ. जगताप यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिक समस्या निवारणाबाबत विविध मागण्या सादर केल्या. यावर जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आरोग्य सुविधेबाबत ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहणार नाहीत. याची सर्वांनी काळजी घ्यावी. अतिदक्षता रूग्णांवरील उपचार वगळता शासकीय तसेच खासगी रुग्णालयांनीही ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे. याबाबत समाज कल्याण विभागाने कोल्हापूर वैद्यकीय संघटनेला पत्र लिहावे. ज्येष्ठ नागरिकांबाबत संबंधित विभागाने कृती आराखडा महिन्याभरात तयार करावा. विविध विभागाने ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुविधा पुरवाव्यात असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment