तळगुळी येथे प्रा. सदाशिव पाटील यांनी पकडला पाच फुटी घोणस - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2019

तळगुळी येथे प्रा. सदाशिव पाटील यांनी पकडला पाच फुटी घोणस

सदाशिव पाटील यांचेकडून पाच हजारावर सापांना जीवदान
पकडलेल्या घोणस सापासह प्रा. सदाशिव पाटील
कालकुंद्री / प्रतिनिधी
तळगुळी (ता. चंदगड) येथे अब्दुल हमीद मुजावर यांच्या घरात घुसलेल्या पाच फूट लांबीच्या घोणस सपाला ढोलगरवाडी सर्प शाळा विभाग प्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी पकडून जीवदान दिले.  गेल्या तीस वर्षात त्यांनी पाच ते सहा हजार सापांना जीवदान दीले आहे. तळगुळी येथील मुजावर यांच्या घरातील जळावु लाकडातून सापाचे  फुत्कार येत असल्यामुळे घरातील महिला व मुले भयभीत झाली.  सर्पमित्र सदाशिव पाटील यांना बोलावल्यानंतर काही वेळात येऊन लाकडात लपलेला अति विषारी घोणस पकडला. त्याला ढोलगरवाडी सर्पोद्यान येथे ठेवण्यात आले. 
अशाप्रकारे विषारी- बिनविषारी पाच ते सहा हजार साप पकडून त्यांना जीवदान दिले. ढोलगरवाडी येथे विद्यार्थिदशेपासून आपण हे कार्य करत असून तेथील लाड विद्यालयात तेवीस वर्षे शिक्षक म्हणून सापांचे प्रबोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यात कोवाड बाजारपेठेला महापुराने वेढले यावेळी कोवाड येथे दुकाने किंवा घरात आश्रय घेतलेले दिडशे साप आपल्या टीमने पकडले. यातील नव्वद टक्के साप बिनविषारी असल्यामुळे त्यांना तेथेच नदीत सोडून दिल्याची माहिती त्यांनी दिली. तळगुळी येथे घोणस पकडल्यानंतर त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याठिकाणी सदाशिव पाटील यांनी विषारी बिनविषारी साप कसे ओळखावे.दंश झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याबद्दल प्रबोधन केले. घोणस हा नागापेक्षा खतरनाक आहे. निद्रिस्त दिसला तरी अति चपळ असून सेकंदाच्या नवव्या भागात तो भक्ष्यावर हल्ला करतो व पुन्हा आपल्या ठिकाणी वेटोळे मारून शांत बसतो. चावल्यानंतर वीष जास्त प्रमाणात भिनल्यास माणूस मरतो किंवा चावलेली जखम गॅंग्रीन होऊन लवकर भरत नाही. घोणस अंडी न घालता एका वेळी ४० ते ५० पिलांना जन्म देतो.त्यामुळे सध्या घोणस ची संख्या लक्षणीय वाढली आहे. मुजावर यांच्या घरी पकडलेला घोणस मादी जातीचा असून सध्या त्यांचा मिलन काळ असल्यामुळे सतर्क रहावे. शिवारातील मोरांच्या भीतीमुळे ते मनुष्य वस्तीकडे वळले आहेत. त्यामुळे घराशेजारी अडगळ ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment