चंदगड तालुक्यात उसाला फुटले तुरे, ऊस उत्पादनात होणार घट - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2019

चंदगड तालुक्यात उसाला फुटले तुरे, ऊस उत्पादनात होणार घट

 शेतकऱ्यांचा पाय पुन्हा खोलात, वातावरणातील बदलामुळे सर्वच जातीच्या उसाला तुरे,
वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा
चंदगड तालुक्यामध्ये ऊसाला आलेले तुरे.
निवृत्ती हारकारे / कार्वे
चंदगड तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि थंडीच्या दिवसात थंडीचा लवलेश नाही, अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून चंदगड तालुक्यातील सर्वच जातीच्या उसाला तुरे फुटले आहेत. उसाला तुरे फुटल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. ऊस उत्पादनात घट होणार आहेच पण उसाच्या वाड्यांचा वैरणीसाठी होत असलेला वापर विचारात घेता शेतकऱ्यांसमोर वैरणीचा प्रश्न आवासून उभा टाकणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा पाय पुन्हा खोलात जाणार हे निश्चित आहे.
चंदगड तालुक्यात यावर्षी जवळपास सगळीकडेच अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. तालुक्यात जवळपास साडेतीन हजार पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भात पीक व उसाचे पीक तब्बल बारा ते चौदा दिवस पाण्याखाली होते. इतके दिवस पिके पाण्याखाली राहिल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताचे नुकसान झाल्याने त्यापासून मिळणाऱ्या पिंजराचे उत्पादन अत्यल्प झाले आहे. पिंजर हे शेतकऱ्यांचा वैरण म्हणून आधार असते. मळणी काढून पिंजर वाचविण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यांनी मळण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. शेतात ओली वैरण नसेल तर जनावरांसाठी वैरण म्हणून प्रामुख्याने पिंजऱ्याचा वापर केला जातो. या झालेल्या नुकसानी नंतर शेतकऱ्यांचे लक्ष शेतात उभ्या असलेल्या उसाकडे होते. उसावर दिसणारी हिरवीगार वाडी शेतकऱ्यांचा तीन चार महिन्यासाठी वैरण म्हणून दुसरा आधार. अतिवृष्टी, हवामानातील झालेला बदल यामुळे या वर्षी उसाला तुरे फुटले आहेत. साधारण नोव्हेंबर - डिसेंबर हा कालावधी उसाला तुरे फुटण्याचा असतो. काहीच जातीच्या उसाला तुरे फुटतात. मात्र यावर्षी बदलत्या वातावरणामुळे जवळपास सर्वच जातीच्या बियाणांना तुरे फुटले असल्याने शेतकरी चिंतेत आहे. उसाला तुरे फुटणे शास्त्राच्या दृष्टीने उसाच्या जातीच्या प्रजननासाठी योग्य असले तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याचे आहे. तुरे फुटलेला उस बियाण्यासाठी वापरणे सुद्धा योग्य नाही. अशी तज्ञांची भावना आहे.या दोन्ही वैरणीची उपलब्धी कमी झाल्याने शेतकऱ्यांचा पाय पुन्हा खोलात गेला आहे.
तालुक्यातील शेतकरी सध्या या वैरण टंचाईचा सामना करण्यासाठी केविलवाणी धडपड करताना दिसत आहे. वैरण प्लॉट तयार करून वैरणीच्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोफत व मुबलक वैरण बियाणे पुरवठा करणे गरजेचे आहे. चंदगड तालुक्‍यात एक लाख लिटरपेक्षा जास्त दररोज दुधाचे उत्पादन होते. या वर्षी दरवर्षीप्रमाणे दुधात वाढ झालेली दिसत नाही. याचे कारण प्रामुख्याने वैरण हेच आहे. यासाठी मका, लसूणघास गवत, मालदांडी शाळू, सिओ -३ गवत, यशवंत -३, मारवेल यासारख्या गवतांचे बियाणे कृषी विभागाने येथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कृषी कर्जमाफी कुणाला मिळणार याचा कोणालाही थांगपत्ता नाही. चंदगड तालुक्यात थकित कर्जदारांची संख्या एकदम कमी असल्याने या कर्जदारांच्या कर्जमाफीचा लाभ येथील शेतकऱ्यांना अत्यल्प मिळणार आहे. दौलत साखर कारखान्यास २०११-१२ सालात पाठवलेल्या व २०१६-१७ मध्ये पाठवलेल्या उसाचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या पदरात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायच नकोसा झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारची कर्जमाफी नियमित कर्जदारांना मिळणे अपेक्षित आहे. यासाठी गावागावातून आवाज उठवला जात आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सेवा संस्थांच्या कार्यालयांना कुलूप लावण्याचे प्रकार घडत आहेत. लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवणे गरजेचे आहे, अशी चंदगड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची भावना झाली आहे.


No comments:

Post a Comment