इब्राहिमपूर येथे विविध उपक्रमांनी माडखोलकर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2020

इब्राहिमपूर येथे विविध उपक्रमांनी माडखोलकर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे माडखोलकर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीरात बोलताना माजी रोहयो राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. एन. एस. पाटील व इतर मान्यवर. 
चंदगड / प्रतिनिधी
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर 28 डिसेंबर 2019  ते 3 जानेवारी 2020 या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांच्या शंभर स्वयसेवकांच्या तुकडीतील पन्नास स्वयंसेवकांनी शिबिरात सहभाग घेतला होता. 
इब्राहिमपूर श्रमसंस्कार शिबीरात बोलताना पत्रकार सुनिल कोंडुसकर
इब्राहिमपूरच्या सरपंच सौ. रुपाली सावंत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. मधुकर जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विधायक कार्याचा डोंगर उभा करता येतो व देशातील तरूणाईला सकारात्मक ऊर्जा मिळते. राष्ट्रीय विकासास मौलिक योगदान मिळते असे सांगितले. गणपती गिलबिले विजय देसाई वसंत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमदानाचा शुभारंभ झाला. डॉ.  स्नेहा देसाई यांनी `महिला सबलीकरण व आरोग्य` या विषयावर व्याख्यान दिले. बदलत्या काळात स्त्रियांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. देवकुमार सुर्यवंशी यांनी निरोगी व निरामय आरोग्यासाठी योगाचे महत्त्व विशद करुन योग व प्राणायाम यांची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.
माडखोलकर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीरावेळी बोलताना पत्रकार संपत पाटील.
डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ. सुधाकर मिणचेकर, डॉ. ए. टी. शिवगण, डॉ. महेश भांदुर्गे यांनी पशुचिकित्सा शिबिरात सक्रिय सहभाग घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. पत्रकार सुनील कोंडुसकर यांनी वर्तमान वास्तव्याचे दर्शन घडविले. पत्रकार संपत पाटील यांनी माध्यमक्रांतीचा आढावा घेतला. ॲड. एस. एल. पाटील व ॲड. आर. पी. बांदिवडेकर यांच्या सहकार्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. शिबिरातील स्वयंसेवकांनी नित्य योग, प्राणायाम करून श्रमदान करण्याचा परिपाठ ठेवला होता. श्रमदानातून आपण रचनात्मक कार्यात सहभागी होत असल्याचा स्वयंसेवकांना सार्थ अभिमान व आनंद वाटत होता. श्रमदानातील युवकांचा सहभाग उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शिबिरात रंगत आली. ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा आनंद घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मुक्तकंठाने प्रशंसा केली. 
शिबिराच्या समारोप प्रसंगी माजी रोहयो राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. आर. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. शिबिराच्या माध्यमातून ग्रामसफाई, पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती प्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचा हेतू ठेवून कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या शिबिराला अर्जुन घुरे, राजेंद्र मरगळे, विनायक शिवनणेकर, सौ. रुपाली देसाई, सौ. संजीवनी हरेर, सौ. रूपाली सुतार, सुरेश हरेर, रमेश हरेर यासह अन्य मान्यवरांनी उपस्थिती व सहकार्य केले.  शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय योजना प्रमुख प्रा. एस. एन. पाटील, सौ. एस. बी. दिवेकर, डॉ. एन. के. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. ए. डी. कांबळे. डॉ. एन. एस. मासाळ, प्रा. आर. एस. पाटील, एस. बी. हासुरे, परशराम भरमगावडा यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment