चंदगड माडखोलकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तुची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2020

चंदगड माडखोलकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तुची मदत

माडखोलकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थ्यीं गरजूंना देण्यासाठी जीवनावश्यक वस्तुचे पॅकींग करताना. 
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. सद्यस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तालुक्यात सर्वत्र लाकडाऊन असल्यामुळे परराज्यातून व जिल्ह्यातून चंदगड तालुक्यात कामानिमित्त हातावरचे पोट असलेले अनेक लोक अडकून पडले आहेत. या लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची अडचण होत आहे. त्यांना या अडचणीत काहीसा दिलासा देण्यासाठी चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील गुडेवाडी, हलकर्णी फाटा, धुमडेवाडी फाटा, दाटे, पाटणे येथील गरजूंना गावो-गोवी फिरुन जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले. माडखोलकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाटपाचे व मदत गोळ्या करण्याचे नियोजन केले. 
यासाठी माडखोलकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील सक्षम व्यक्तींना हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना वस्तु स्वरुपात मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत गुडेवाडी ग्रामस्थांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला एक क्विंटल तांदूळ, नाचने, गहु,  बटाटे या प्रकाराची मदत केली. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत र. भा. माङखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने गुडेवाडी ग्रामस्थांनी गावातून जमा करुन एनएसएस विभागाकडे दिलेले एक क्विंटल तांदूळ व स्वयंसेवकांनी स्वतःच्या पैशातून डाळी, कडधान्ये, तेल, मीठ, चटणी, बटाटे, कोलगेट, साबण, सॅनिटायझर आदी प्रकारचे जीवनावश्यक साहित्य गुडेवाडी, हलकर्णी फाटा, धुमडेवाडी फाटा, दाटे, पाटणे येथील गरीब, फासेपारधी, अनाथ, अपंग व मजूर संकटग्रस्त अशा 76 कुटुंबाना मदत करण्यात आली. गुडेवाडी ग्रामस्थ, सरपंच, सदस्य व स्वयंसेवक शिवाजी पाटील, अजय सातार्डेकर, श्रीपाद सामंत, पांडुरंग माईनकर, नितिन सुतार, प्रा. संजय एन. पाटील या सर्वांच्या सहकार्याने हे सामाजिक कार्य यशस्वी झाले. कोरोनाच्या भितीमुळे अनेक लोक घरातून बाहेर पडत नाहीत. मात्र एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून दाखविलेल्या धाडसाचे तालुक्यातून कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment