चंदगड तालुक्यातील पुणे-मुंबईसह अन्य राज्यातून आलेल्या ८५ जणांचे स्वॅब तपासणीला - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2020

चंदगड तालुक्यातील पुणे-मुंबईसह अन्य राज्यातून आलेल्या ८५ जणांचे स्वॅब तपासणीला

चंदगड / प्रतिनिधी
राज्यात करोनाचे संकट दिवसेनदिवस गडद होत आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातच सरकारने काही अटीवर राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपापल्या गावी परतण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावी परतत आहेत. अन्य राज्य व जिल्ह्यातून आलेल्या ८५ जणांचे स्वॅब घेवून आज ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
चंदगड तालुक्यातील कामानिमित्त अन्य जिल्ह्यामध्ये व पुणे-मुंबईसारख्या शहरामध्ये अडकलेले लोक मोठ्या प्रमाणात गावी येत आहेत. हि गावासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींनी गावचा विचार करुन सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या लोकांना शाळासारख्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी दक्षता कमिटीच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे. मात्र बाहेरुन येणाऱ्यांची संख्या पाहता गावाला याचे नियोजन करणे अवघड जात आहे. करोनाच्या भितीने रोज अनेक लोक `गड्या आपला गावच बरा` म्हणत गावी परतत आहेत. चंदगड तालुक्यात आतापर्यंत चारशेहून अधिक लोक गावी परतले आहे. काही लोक स्वत:च्या वाहनाने तर काही ग्रुपने वाहन करुन आले आहेत. सरकारनेही केलेल्या सुविधांचा लाभ अनेकांनी घेतला आहे. यापैकी दिडशेहून अधिक जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

                                    पत्नी व मुलाचाही स्वॅब आज पुन्हा तपासणीला
मुंबईहून आलेल्या अलबादेवी येथील कुटुंबातील पती पॉझिटीव्ह आढळून आल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णांलयात दाखल केले आहे. मुंबई ते गावाकडे प्रवासा दरम्यान त्याची पत्नी व पाच वर्षाचा मुलगा त्याच्या संपर्कात आल्या असल्याच्या संशयावरुन त्याच्याही स्वॅबची तपासणी केली होती. मात्र त्यावेळी ते निगेटीव्ह होते. तरीही पत्नी व मुलाचा आज स्वॅब घेवून तो देखील तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment