पारगड येथील शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा पारगड ग्रामस्थ व मजरे कार्वे येथील फौंडेशनचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2020

पारगड येथील शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा पारगड ग्रामस्थ व मजरे कार्वे येथील फौंडेशनचा निर्णय

मजरे कार्वे / प्रतिनिधी
    मजरे कार्वे येथील शहीद जवान वेलफेअर फौंडेशन, शिवनेरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पारगड ग्रामस्थांच्या वतीने किल्ले पारगड येथे दरवर्षी 6 जून रोजी भव्य दिव्य स्वरूपात होणारा शिवराज्याभिषेक सोहळा या वर्षी साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पारगड ग्रामस्थ व मजरे कार्वे येथील शहीद जवान वेलफेअर फौंडेशन यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
       संपुर्ण जगात कोरोना वायरस मुळे आहाकार उडाला आहे. भारतभर या महामारीमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याचा मोठा धोका महाराष्ट्राला पोहचला आहे.यामुळे केंद्र शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने 144 कलम व संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात कोणतेही धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास बंदी घातली आहे.त्याच अनुषंगाने दरवर्षी  रायगडावर  होणारा शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा साधेपणाने साजरा करण्याचे युवराज संभाजीराजे  
यांचे नियोजन सुरू आहे. 
       कोरोनाचा प्रसार वाढू नये, कोरोनाची साखळी तोडणे सध्या गरजेचे आहे. यासाठी सामाजिक अंतर राखणे, मास्क चा वापर करणे इ. बाबी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. यासाठी पारगड येथे होणारा हा सोहळा साधेपणाने करणे, सोहळ्यासाठी एकत्र न येणे गरजेचे आहे. त्यामुळे या सोहळ्यात खंड पडू न देता सामाजिक अंतर राखून हा सोहळा अत्यंत साधेपणाने करण्याचे ठरविण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे मजरे कार्वे येथे होणारे कार्यक्रम व मिरवणूक सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. पुढील वर्षी नेहमी प्रमाणे हा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.या सोहळ्याला कोणीही शिवभक्तांनी हजर राहू नये. पारगड ग्रामस्थ व मजरे कार्वे येथील फौंडेशनला सर्व शिवभक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment