बेळगाव -वेंगुर्ला रोड अत्यावश्यक वाहतुकीसाठी खुला, चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रयत्नांना यश - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2020

बेळगाव -वेंगुर्ला रोड अत्यावश्यक वाहतुकीसाठी खुला, चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रयत्नांना यश

शिनोळी व बाची दरम्यान बेळगाव वेंगुर्ला रस्ता खुला करताना.
मजरे कार्वे / प्रतिनिधी
      कोरोणाचा प्रसार सगळीकडे पसरत असताना चंदगड तालुक्यात रुग्ण आढळल्यामुळे कर्नाटक प्रशासनाने बेळगाव - वेंगुर्ला रोड बाची जवळ मुख्य रस्त्यावर माती टाकून वाहतुकीसाठी बंद केला होता. हा रस्ता चंदगड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. चंदगड वासियांचे जवळपास सर्वच व्यवहार बेळगाव शी निगडीत आहेत. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्यामुळे चंदगड तालुक्यातील उद्योगधंदे व शेतकऱ्यांसह जवळपास सर्वच व्यवहारावर संकट आले होते.
       महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत  शिनोळी औद्योगिक वसाहत आहे. या शिनोळी औद्योगिक वसाहतीमध्ये जितके उद्योगधंदे आहेत ते सर्व बेळगावच्या उद्योगांशी निगडित आहेत. या उद्योगधंद्यांना लागणारा सर्वच  कच्चामाल बेळगाव वरून उपलब्ध होत असतो. त्यामुळे हा रस्ता बंद केल्याने येथील औद्योगिक वसाहतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. औद्योगिक वसाहतीमधील चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखालील येथील सर्व उद्योगांचे   प्रतिनिधी व बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स यांनी  उद्योगधंद्यांची कैफियत बेळगावच्या प्रशासनासमोर मांडली .त्यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा रस्ता बेळगाव प्रशासनाने खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बेळगाव मध्ये कोरोणाचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या रस्त्यावरून फक्त रुग्णवाहिका, मालवाहतूक करणारी परमीट असलेली वाहने व अत्यावश्यक सेवा यासाठीच हा रस्ता खुला राहणार आहे. असे कळविण्यात आले आहे. यामध्ये शेतीशी निगडित असलेले सर्व वाहने या  रस्त्यावरुन सोडावीत अशी मागणी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. चंदगडच्या शेतीव्यवसायाला मुख्य बाजारपेठ बेळगाव आहे. बेळगावचा संपर्क तुटल्याने चंदगड तालुक्यातील शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे शेती व्यवसायाशी निगडित असलेली सर्व वाहने बेळगाव बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी सोडावीत अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment