चंदगड तालुक्यात आज नवीन सात कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या १३ वर, धोका वाढला - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2020

चंदगड तालुक्यात आज नवीन सात कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या १३ वर, धोका वाढला

चंदगड / प्रतिनिधी
      चंदगड तालुक्यातील आज एकाच दिवशी नवीन सात रुग्णांची भर पडल्याने तालुक्यात भितीचे वातावरण आहे. आज बोंजूर्डी, नागनवाडी, इब्राहीमपूर येथे प्रत्येकी एक तर तेऊरवाडी व नागवे येथे प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या १३ इतकी झाली आहे  
      मुबंई वरून प्रवास करून आलेल्या दोघांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे पूणे मूंबई येथून गावी येणाऱ्यांकडू अधिक धोका वाढला आहे. चंदगड तालूक्यात आज पर्यंत तेरा कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण झालेत.
     यामध्ये २७ ते ३६ वयोगटातील पाच तर ५४ ते ६१ वयोगटातील दोघांचा समावेश आहे. प्रशासनाने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांनाही ताब्यात घेण्यात येणार असल्याची  माहिती तालूका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. के. खोत यांनी दिली.
यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे व कोरोना विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून  अन्य व्यक्ती संपर्कातून होऊ नये. यासाठी आज बोंजूर्डी, नागनवाडी, इब्राहीमपूर, नागवे, तेऊरवाडी गावाच्या सीमा बंद करण्याचा आदेश प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिला आहे. तर या गावा लगत तीन किलोमीटर परिसरात येणारी गावे प्रतिबंधक गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावातील आस्थापना, दुकाने, व्यवसाय बंध राहतील. फक्त अत्यावश्यक सेवा दूध,भाजीपाला, किराणामाल,औषधे,खते बी-बियाणे इत्यादी सेवा चालू ठेवणेबाबत ग्रामसमितीने दक्षता घेणे गरजेचे आहे.

                चंदगड शहरात आज गर्दी.................
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यांमध्ये चंदगड शहरामध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच प्रशासनाच्या वतीने काही अटींवर पुणे-मुंबई व अन्य शहरातील चंदगड तालुक्यातील नागरीकांना गावी जाण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे कालपर्यंत चंदगड तालुक्यात सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण होते. तालुक्यात एकही रुग्ण नसताना लॉकडाऊनच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्यापर्यंत चंदगड शहरात लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन केले गेले. मात्र सद्यस्थितीला चौथ्या टप्यात मात्र चंदगड शहरात खरेदी व अन्य कामासाठी येणाऱ्या लोकांच्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. शहरात येणाऱ्या लोकांची हि संख्या पाहता निमय पाळले जात नसल्याने शहरातील नागरीकांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. गुरुवार चंदगड शहरातील बाजारचा दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी होती. शहरातील दुकानदारांनीही या गोष्टीचे गांभीर्य ओळखून उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. 

No comments:

Post a Comment