कर्यात भागात धूळवाफ पेरण्यांची लगबग, शेती कामात पुणे मुंबई करांचा उत्साही सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2020

कर्यात भागात धूळवाफ पेरण्यांची लगबग, शेती कामात पुणे मुंबई करांचा उत्साही सहभाग

 कालकुंद्री (प्रतिनिधी)
       चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात खरीप हंगामातील भात पिकाच्या धुळवाफ पेरण्या गतिमान झाल्या आहेत. कोरोनाचे  भय दूर सारून परिसरातील बळीराजा पेरणीपूर्व अंतिम मशागती व धुळवाफ पेरण्यात कुटुंबासह मग्न झाला आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले पुणे-मुंबईकरही उत्साहाने शेती कामाला लागल्याचे चित्र आहे.
       जिल्ह्यातील भात पिकाचे कोठार समजल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातील माणगाव पासून राजगोळी पर्यंतच्या  परिसरातील तीस-चाळीस गावात भात पिकाखालील जमीन मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडे ऊस पिकाखालील जमीन वाढली असली तरी भागातील भात पिकाचा बाज अद्याप टिकून आहे. कमी श्रमात धुळवाफ पेरण्या पूर्ण करण्यासाठी मान्सून पूर्व रोहिणी नक्षत्रात  पाच पात्यांच्या कुरीचा  वापर सर्रास शेतकरी करतात. यंदा पेरणी हंगामाची सुरुवात नुकतीच किणी येथे कृषी सहाय्यक एस डी मुळे, बी आर घवाळे, ए बी मुळे, कृषी सेवक ए एस चव्हाण, शेतकरी संजय कुट्रे आदींच्या उपस्थितीत कुरी पूजनाने करण्यात आली. सध्या कृषी केंद्रावर सोनम, दप्तरी, इंद्रायणी, बासुमती, आर वन, टायचुंग, वाय एस आर, श्रीराम, ३१२ आदी संकरित बियाणे उपलब्ध आहेत. यातील बहुतांशी जाती गुणगुणे,सुरूम, टोके,भोंगे सारखी किड पडत असल्याने वर्षभर साठवणुकीसाठी अयोग्य असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे विविध किडीला प्रतिकार करणाऱ्या पारंपरिक वाणांच्या शोधात अनेक शेतकरी आहेत. सद्या किणी, नागरदळे, कोवाड,निटुर, कालकुंद्री, कुदनूर आदी गावांत पेरण्यांचा जोर आहे. तथापि दिवसा गणिक वाढणारे खतांचे, किटकनाशके व बियाण्यांचे दर यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. तरीही सर्व संकटावर मात करत पुन्हा जगाचा पोशिंदा उभा राहतो आहे.

No comments:

Post a Comment