अलबादेवी येथील पॉझिटीव्ह रुग्णांच्या भावासह अन्य २७ जणांचे अहवाल निगेटीव्ह - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2020

अलबादेवी येथील पॉझिटीव्ह रुग्णांच्या भावासह अन्य २७ जणांचे अहवाल निगेटीव्ह

चंदगड / प्रतिनधी
      देशासह राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच चंदगड तालुक्यासाठी सद्यातरी दिलासादायक बातमी आहे. ९ मे २०२० ला मुंबईहून आलेला चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील एक व्यक्ती करोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. त्याच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन त्याचा चुलत भावाचा स्वॅब घेवून तपासणीला पाठविला होता. त्याच्यासह अन्य 27 जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले. 
    चंदगड तालुक्यात करोना रुग्ण सापडल्यापासून तालुक्यातील वातावरण भितीदायक आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण थेट दवाखान्यात आला असला तरी लोकांच्यातून याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्याचा भाऊ अडकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रेफर केल्याचे पत्र घेवून चंदगडला देण्यासाठी आला होता. यावरुन ते या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन त्याचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. मात्र तो निगेटीव्ह आला आहे. तसेच चंदगड येथे ज्या ठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. त्यांची देखभाल व देखरेखीसाठी असलेल्या नगरपंचायतीचा एक कर्मचारीही त्यांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन त्यालाही क्वारंटाईन करुन त्याचा स्वॅब तपासला असता तो निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे चंदगडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या दोघांसह अन्य 27 जणांचे अहवालही निगेटीव्ह आले आहेत. 

अलबादेवी येथील पॉझिटीव्ह रुग्णांसोबत मुंबईहून चंदगडला खासगी गाडीने आलेली पत्नी व मुलाचाही स्वॅब तपासणीसाठी पाठविला आहे. तसेच हारुर (ता. आजरा) येथील अंत्यसंस्काराला गेलेल्या चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील दोन व मलतवाडी येथील एकाचा अहवाल यासह पुणे-मुंबई व शहरातून आलेल्या २७ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्याचे अहवाल काय येणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे. आज पुन्हा शहरातून आलेल्या १२५ हून अधिक जणांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

No comments:

Post a Comment