सोनारवाडी (ता. चंदगड) येथे करोना पॉझिटीव्ह सापडल्याने गावातील रस्ते असे बंद केले आहेत. |
देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाचा कोल्हापूर जिल्ह्यातही हि संख्या शंभरीच्या जवळ आली आहे. अशातच पुणे-मुंबईसह शहरातून येणाऱ्या गावाकडील नागरीकांच्याकडून चंदगड तालुक्यात धोका वाढला आहे. सोनारवाडी (ता. चंदगड) येथे आज आलेल्या अहवालानुसार एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला तर चिंचणे येथील कमलवाडी येथे एकजण असे आज दिवसभरात दोन पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. सोनारवाडी येथे पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने अडकूर परिसरात खळबळ उडाली आहे. चंदगड तालुक्याच्या रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे.
सोनारवाडी येथील हा व्यक्ती 15 मे रोजी मुंबई घाटकोपरमधून खासगी गाडीने गावी यायला निघाला होता. 16 मे 2020 रोजी तो गावी आला. गावी येताना कोल्हापूर येथे त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. आज मंगळवार (ता. १९) पहाटे त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. तो शहरातून आल्यामुळे त्याला गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. या पॉझिटीव्ह रुग्णांला सीपीआर रुग्णांलयात दाखल केले आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून गाव सील केले आहे. सोनारवाडीपासून जवळच अडकूर हे मोठे बाजारपेठेचे ठिकाण असून सोनारवाडी गावातील लोकांचा अडकूर बाजारपेठेशी संबंध आहे. सोनारवाडी गावात रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीच बंद ठेवलेल्या बाजारपेठेत आता अधिक कडक लॉकडाऊन पाळण्याचे अडकूर येथील ग्रामस्थांनी ठरविले आहे.
सोनारवाडी येथे करोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सोनारवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डुक्करवाडी, जट्टेवाडी, बागिलगे, माणगांव, लाकुरवाडी, गुडेवाडी, गंधर्वगड, जोगेवाडी, पोरेवाडी, आमरोळी, गुडेवाडी व मुगळी या बारा गावामध्ये कंटेनमेंट झोन तर अन्य सात किलोमीटर परिसरात येणाऱ्या ५५ गावांचा बफर झोनमध्ये समावेश केला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व सीमा बंद करुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याबाबत ग्रामसमितीने दक्षता घेण्याच्या सुचना केल्या आहेत.
दरम्यान गडहिंग्लज येथील काळामवाडी येथे करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने तीन किलोमीटर परसरात येणाऱ्या दोन्ही तालुक्याच्या सीमेवरील चंदगड तालुक्यातील मलतवाडी, जक्कनहट्टी, लक्कीकट्टे, निट्टूर, घुल्लेवाडी, माणगाव या सहा गावांचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश झाला आहे.
चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील मुंबईहून आलेला पहिला रुग्ण चंदगड येथे अलीकरण कक्षात सापडला. मुंबईहून चंदगड तालुक्यातील गवसे येथे येत असताना कोल्हापूर येथे गवसेतील एक महिला व दोन मुले पॉझिटीव्ह सापडली. आज पहाटे सोनारवाडी येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह तर दुपारनंतर चिंचणे (कमलवाडी) येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चंदगड तालुक्याची पॉझिटीव्ह रुग्णसंख्या आता सहावर पोहोचली आहे. सीपीआरमध्ये सापडलेले चंदगड तालुक्यातील गवसे येतील तीन रुग्ण वगळता बाकीचे तीन हे त्या-त्या गावामधील शाळेत क्वारंटईन होते.
No comments:
Post a Comment