माणगाव येथे महापुरात कोसळलेल्या घरांची नुकसान भरपाई देण्‍यात शासनाचा दुजाभाव, पांडुरंग चिंचणी यांची तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2020

माणगाव येथे महापुरात कोसळलेल्या घरांची नुकसान भरपाई देण्‍यात शासनाचा दुजाभाव, पांडुरंग चिंचणी यांची तक्रार

माणगाव / प्रतिनिधी
          गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. चंदगड तालुक्यातील माणगाव येथे चुकीच्या पद्धतीने सर्वे करून गोरगरीब जनतेवर शासनाने दुजाभाव केल्याचे चित्र स्पष्ट झाले असून भिंतीला तडे गेलेल्यांना लाखाच्या घरात मदत तर आखे घर  कोसळणार्‍याला दमडीही मिळाली नसल्याची तक्रार पांडुरंग वैजू चिंचणी यांनी केली आहे.
          गेल्या वर्षी चंदगड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे माणगाव येथील पांडुरंग वैजू चिंचणगी  यांचे राहते संपूर्ण घर कोसळले आणि हे कुटुंब बेघर झाले. शासकीय आदेशाप्रमाणे घराचा पंचनामा झाला मात्र गावात  ज्यांची एक भिंत पडली अशांना 95 हजार रुपये व भिंतींना तडे गेलेल्या मालकांना 6000 रु शासन मदत मिळाली. मात्र  ज्याचे अख्खे घर जमीनदोस्त झाले  त्याचा पंचनामा होऊन दमडीही मिळाली नाही त्यामुळे पांडुरंग वैजू चिंचणगी यांना आपल्या घरापासून बेघर व्हावे लागले आहे. शासनाने पंचनामा करून मदत देताना दुजाभाव का केला. शासन स्तरावरून चुकीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आपल्याला न्याय मिळावा अन्यथा  आपण  आपल्या पडीक घरातच आत्मदहन करणार असा इशारा पांडुरंग वैजू चिंचणगी  यांनी दिला आहे.  माणगाव परिसरातून या गरीब व्यक्तीला न्याय मिळावा असा सूर मात्र  जोर धरत आहे.


No comments:

Post a Comment