बेळगाव मार्गतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास हजार रुपयांचा धनादेश आमदार राजेश पाटील यांच्याकडे सुपुर्द - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2020

बेळगाव मार्गतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास हजार रुपयांचा धनादेश आमदार राजेश पाटील यांच्याकडे सुपुर्द

आमदार राजेश पाटील यांचेकडे बेळगाव मार्ग संस्थेकडून महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीसाठी धनादेश देताना अॅड अशोक पोतदार , कृष्णा शहापूरकर.
तेऊरवाडी - सीएल वृत्तसेवा
         कोरोना महामारीने महाराष्ट्रात हाहाकार माजlविला आहे. या संकटकाळात बेळगाव मार्ग या संस्थेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51  हजार रुपयांची मदत दिली. या मदतीचा धनादेश चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
          मराठी पत्रकार संघाच्या "पत्रकार भवन" मध्ये रविवारी झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात हा धनादेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी 'बेळगाव मार्ग' चे  अध्यक्ष ऍड. अशोक पोतदार होते. सरचिटणीस कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर ऍड. अशोक पोतदार  यांच्या हस्ते आमदार राजेश पाटील यांच्याकडे मदत सुपूर्द करण्यात आली. तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना आमदार राजेश पाटील यांनी आपल्या भाषणात कर्नाटकात राहूनही  महाराष्ट्राला मदत देऊन बंधुभाव जोपासला आहे. महाराष्ट्राला याचा कधीही विसर पडणार नाही. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट आहे,  या न्यायालयीन लढाईत महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून मी कायम आपल्या समवेत आहे, अशी ग्वाही दिली. कार्याध्यक्ष अॅड. नागेश सातेरी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी,  माजी उपमहापौर रेणू किल्लेकर,  अरुण कामुले, सदानंद सामंत,  मधु पाटील,  शेखर पाटील,  सुहास हुद्दार,  विकास कलघटगी,  विलास अध्यापक, अॅड. अजय सातेरी आदी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment