चंदगड तालुक्यातील आज पाच जण पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या ७२ - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2020

चंदगड तालुक्यातील आज पाच जण पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या ७२

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
                 देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे-मुंबईवरुन आलेल्या नागरीकांच्यामुळे ग्रामीण भागातील संख्या वाढ सुरुच आहे. आज दुपारी सव्वाएक वाजता आलेल्या अहवालानुसार चंदगड तालुक्यात काजिर्णे येथील दोन व निट्टूर येथील तीन जणांना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील रुग्णांची संख्या आता ७२ वर पोहोचली आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे चंदगड तालुक्यातील ४१ कोरोना पॉझिटीव्ह असलेले रुग्ण उपचाराअंती बरे होवून घरी गेले आहेत. हे सर्वजण काही दिवसापूर्वी मुंबईहून गावी आले होते. 
               काजिर्णे व निट्टूर या दोन्ही गावातील पाचही जणांना स्वॅब ४ जून २०२० रोजी घेण्यात आला होती. आज ७ जूनला दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये काजिर्णे येथील एक ३० वर्षाचा पुरुष व २६ वर्षाची महिला तर निट्टूर येथील एक ४० वर्षाचा पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. यातील मुलगी १२ वर्षाची असून महिला ७२ वर्षाची आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. २९ मे ला काजिर्णे येथे पहिला रुग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कात असलेले आणखी दोन जण आज दुपारी पॉझिटीव्ह आढळल्याने काजिर्णेत एकूण ३ जण पॉझिटीव्ह आहेत. निट्टूर येथे यापूर्वी ४ जूनला एक रुग्ण सापडला होता. त्याच्या संपर्कातील अन्य तिघांचे अहवाल आज दुपारी पॉझिटीव्ह आल्याने निट्टूर गावची रुग्णसंख्या ४ झाली आहे. सर्व पॉझिटीव्ह रुग्णांच्यावर चंदगड येथील कोरोना केअर सेंटरवर उपचार केले जाणार आहेत. 


No comments:

Post a Comment